कळंबीतील अल्पवयीन मुलीचे दोघांकडून अपहरण
By Admin | Updated: April 23, 2015 00:58 IST2015-04-21T00:13:45+5:302015-04-23T00:58:27+5:30
गुन्हा दाखल : फूस लावून पळवून नेल्याची नातेवाईकांची तक्रार; शोधासाठी दोन पथके रवाना

कळंबीतील अल्पवयीन मुलीचे दोघांकडून अपहरण
विटा : फूस लावून कळंबी (ता. खानापूर) येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमोल लक्ष्मण चव्हाण व महेंद्र हणमंत धनवडे (दोघेही रा. भाळवणी) या दोघांविरुध्द विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबी येथील १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी भाळवणी विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दि. १८ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून अमोल व महेंद्र हे दोघे कळंबी गावात मुलीच्या घरासमोर आले. त्यावेळी मुलीच्या घरातील नातेवाईक झोपी गेल्याचे पाहून या दोघांनी दुचाकीवरून मुलीचे अपहरण केले. हा प्रकार दुसऱ्यादिवशी सकाळी मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी अन्य नातेवाईक, मुलीच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. ठिकठिकाणी तिचा शोध घेतला. परंतु मुलगी सापडली नाही. त्यानंतर भाळवणी येथील अमोल व महेंद्र या दोघांनी फूस लावून मुलीचे अपहरण केल्याचे मुलीच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी रविवारी रात्री उशिरा विटा पोलिसांत अमोल चव्हाण व महेंद्र धनवडे या दोघांविरुध्द मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद दिली. याप्रकरणी अमोल व महेंद्र या दोघांवर अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे करीत आहेत. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाने खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)