कुजबुज सांगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST2021-09-18T04:27:36+5:302021-09-18T04:27:36+5:30
जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधी हल्ली सातत्यानं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असतो. पुण्या-मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात कुठंही फडणवीस आले की, ...

कुजबुज सांगली
जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधी हल्ली सातत्यानं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असतो. पुण्या-मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात कुठंही फडणवीस आले की, त्यांच्या कार्यक्रमात पप्पूची उपस्थिती असते. सांगली विधानसभेचे बाशिंग गुडघ्याला बांधल्यानंच त्याची ही धावपळ चालल्याची चर्चा आहे. निवडणुकांना अद्याप तीन वर्षांचा अवकाश असला तरी इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केलीय म्हणायची.
बाईसाहेबांची तक्रार कोणत्या कलमात बसवायची?
काही दिवसांपूर्वी पोलिसांत नाजूक तक्रारीसह परित्यक्ता महिला आली. तिचे एका विवाहित पुरुषासोबत संंबंध होते. मौजमजेनंतर त्यानं तिच्याकडं पाठ फिरविली. फोनही घेत नव्हता. महिलेनं पोलिसांना साकडं घातलं, काहीही करून त्याला परत आणा म्हणून. तिची तक्रार कायद्याच्या कोणत्या कलमात बसवायची हा प्रश्न होता. त्याच्याविरोधात बलात्कार किंवा फसवणुकीची तक्रार देण्यासही ती तयार नव्हती. अखेर एका अनुभवी महिला पोलिसानं समजूत घातली. कायद्यानुसार दोघांचं कोणतंही नातं नसल्यानं त्याला परत आणू शकत नसल्याचं सांगितलं, तरीही प्रयत्न करण्याच्या आश्वासनानंतर भरल्या डोळ्यानिशी ती परतली.