नेर्ले गटात निवडणुकीपूर्वीच ‘कृष्णा’चा बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST2021-01-04T04:22:46+5:302021-01-04T04:22:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २०२१ च्या पहिल्या सत्रातच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याअगोदरच ...

नेर्ले गटात निवडणुकीपूर्वीच ‘कृष्णा’चा बिगुल
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २०२१ च्या पहिल्या सत्रातच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याअगोदरच तिन्ही गटाचे नेते उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. निवडणुकीअगोदरच सत्ताधारी सहकार पॅनेलने नेर्ले गटातील काळमवाडी (ता. वाळवा) येथील काळमादेवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला.
नेर्ले गटात नेर्ले, केदारवाडी, कासेगाव, काळमवाडी, भाटवाडी, तंबावे, बेलवडे, कापूसखेड आदी गावे आहेत. येथे एकूण तीन हजारच्या आसपास सभासद आहेत. त्यामुळे सहकार पॅनेलचे प्रमुख डॉ. अतुल भोसले यांनी काळमवाडी येथे मोजकेच कार्यकर्ते आणि विद्यमान संचालकांच्या उपस्थितीत देवीचे दर्शन घेऊन प्रचार बैठक घेतली. यावेळी माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक लिंबाजी पाटील, संचालक गिरीश पाटील, कापूसखेड येथील माजी सरपंच प्रदीप पाटील उपस्थित होते.
सहकार पॅनेलमधून इच्छुकांमध्ये मोठी स्पर्धा राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नर्ले गावात सोळाशेच्या आसपास सभासद असल्याने निवडणुकीअगोदरच ‘कृष्णा’चे रणांगण रंगले आहे. जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणारे दिलीप पाटील, तर राहुल आणि सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गिरीश पाटील सत्ताधारी सहकार पॅनेलचे विद्यमान संचालक आहेत, तर माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलचे सुभाष पाटील विद्यमान संचालक आहेत.
महेश पाटील, सयाजी पाटील, डॉ. एस. व्ही. पाटील, सुभाष पाटील, वसंत पाटील, जे. बी. पाटील, शुभम पाटील, कापूसखेड येथील प्रदीप पाटील आदी ‘कृष्णा’वर जाण्यास इच्छुक आहेत. आता फक्त कोणत्या पॅनेलमधून कोण, हे नेर्लेच्या राजकारणातील राजकीय गणित कोणालाही कळले नाही.
फोटो १)०३दिलीप पाटील
२)०३सुभाष पाटील
३)०३गिरीश पाटील