लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतील मतदानाला तीन दिवस बाकी आहेत. विजयासाठी सत्ताधारी सहकार आणि रयत पॅनलच्या नेत्यांनी रात्रीचा दिवस केला आहे. कोरोनाचे सावट आहे. परंतु पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पॅनल प्रमुख एका एका सभासदाशी संपर्क साधत असल्याने त्यांचा भाव वधारला आहे.
प्रारंभीच्या टप्यात रयत पॅनलचे डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सोशल मीडियावर प्रचाराची बांधणी केली. यशवंतराव मोहिते यांचा विचार पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निवडणुकीत रयतेचा टिकाव लागणार नाही हीच चर्चा कृष्णाच्या कार्यक्षेत्रात होती. त्यानंतर रयत आणि संस्थापक पॅनल यांच्या मनोमिलनच गुऱ्हाळ संपता संपेना. अखेर तिरंगी लढतीचा मुहूर्त सापडला आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सर्वच तयारीने एन्ट्री केली आणि थेट सत्ताधारी सहकार म्हणजे डॉ. सुरेश भोसले आणि डॉ.अतुल भोसले यांनाच टार्गेट केले.
सहकाराचे सर्वच नेते हवेत होते. गेल्या पाच वर्षांत कृष्णेची आर्थिक परिस्थिती भक्कम केली. त्यामुळे सभासद खूश आहेत. ही निवडणूक सहकाराच्या बाजूने एकतर्फी होईल असाच अंदाज काही मंडळी करत होते. परंतु राज्यमंत्री विश्वजित कदम थेट रयत यांच्या बाजूने उतरले त्यामुळे डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनीही संपर्क वाढविला. दोन्ही पॅनलच्या भूमिका ापाहता अविनाश मोहिते यांनीही आपला संपर्क वाढविला. त्यामुळे सभासदांचा भाव चांगलाच वधारला आहे.
एकीकडे सहकार पॅनलचे पारडे जड होत असताना विश्वजित कदम यांनी प्रचारातला आपला मुक्काम वाढविला आणि भारती विद्यापीठाची फौज कामाला लावली. सहकाराला थेट आव्हान दिले. इंदाजित मोहिते यांनी निवडणुकीची सूत्रे विश्वजित कदम यांच्याकडे सोपवली. तेव्हापासून कदम आणि भोसले यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
स्वतः डॉ सुरेश भोसले प्रत्येक सभासदाला टिपण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधकांची भूमिका पाहता संस्थापक पॅनलनेही संपर्क दौऱ्याची गती वाढवली आहे. तब्बेत साथ देत नसतानाही अविनाश मोहिते यांनी कराड व वाळवा तालुका पिंजून काढला आहे. त्यांची आई नूतन मोहिते रणांगणात उतरल्या आहेत. त्यामुळे तिरंगी लढतीत संस्थापक पॅनल बाजी मारेल, असे काही
उमेदवार ठामपणे सांगत आहेत. मात्र नेमकी बाजी कोण मारणार हे आताच सांगणे कठीण आहे.
चौकट
हात धुवून घेण्यासाठी सभासद आतुरलेले
तिन्ही पॅनेल प्रमुखांनी प्रत्येक गट पिंजून काढला आहे. त्यामुळे रंगत आली आहे. डॉ. विश्वजित कदम यांची एन्ट्री आता लक्ष्मी पावलाने झाली आहे. असे सभासदातून बोलले जात आहे. त्यामुळे भोसले बाप लेकाने आपले हात मोकळे केले आहेत. यावेळी संस्थापक पॅनलने आपला हात आखुडता घेतला आहे. तरीसुद्धा कृष्णेच्या वाहत्या पाण्यात हात धुवून घेण्यासाठी सभासद आतुरलेले आहेत.