‘कृष्णा’च्या फडात नेत्यांच्या दंड, बैठका!
By Admin | Updated: May 20, 2015 00:11 IST2015-05-19T23:22:00+5:302015-05-20T00:11:04+5:30
आरोप-प्रत्यारोपाने प्रचारात रंगत : नदी प्रदूषणाच्या घटनेवरून राजकारण पेटले

‘कृष्णा’च्या फडात नेत्यांच्या दंड, बैठका!
अशोक पाटील - इस्लामपूर -यशवंतराव मोहिते सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येणाऱ्या महिन्याभरात सत्ताधारी अविनाश मोहितेंसह डॉ. इंद्रजित मोहिते आणि डॉ. सुरेश भोसले हे एकमेकांविरोधात उभे असून, ग्रामीण भागातील बैठका आरोप- प्रत्यारोप करून रंगवू लागले आहेत.कृष्णा नदीतील दूषित पाण्याचे राजकारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेटवण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. ‘कृष्णा’च्या सत्ताधाऱ्यांमुळेच कृष्णा नदीतील पाणी दूषित होऊन लाखो मासे मृत झाल्याचा आरोपही केला जात आहे. परंतु अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी या आरोपाचे खंडण करीत, आमच्या कारखान्याचा आणि दूषित पाण्याचा संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असला तरी, गेल्या महिन्याभरापासून कारखान्याच्या आजी-माजी अध्यक्षांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावे पिंजून काढली आहेत. डॉ. इंद्रजित मोहिते यांनी तर गेल्या वर्षभरापासून ‘कृष्णा’च्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. विधानसभा निवडणुकीपासून डॉ. सुरेश भोसले हे ‘कृष्णा’चा ताबा मिळवण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांनी कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांची बांधणी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, तर विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते हे, गेल्या पाच वर्षांत आम्ही काय केले, याचा पाढा सभासदांसमोर वाचत, पुन्हा एकदा मला संधी द्या, अशी विनंती करत आहेत. कारखान्याचा गळीत हंगाम कसा यशस्वी केला, याचा जाहीरनामाच मांडण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
बोरगाव येथील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झाल्याची घटना घडल्याचे पडसाद ‘कृष्णा’च्या फडावर उमटू लागले आहेत. विरोधकांनी कृष्णा कारखान्याच्या रसायन व मळीमिश्रित पाण्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे.परंतु अविनाश मोहिते यांनी हा आरोप खोडून काढत, या परिसरात असलेल्या इतर उद्योग, कारखान्यांमुळेही हा प्रकार घडू शकतो, यामध्ये आमच्या कारखान्याचा काहीही संबंध नाही, असा खुलासा केला आहे.
एकंदरीत आता कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने वातावरण दिवसेंदिवस तापत जाणार आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. त्यातच सक्षम उमेदवार मिळवण्यासाठी तिन्ही पॅनेलप्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
‘त्याच्या’शी कारखान्याचा संबंध नाही
बोरगाव (ता. वाळवा) येथील नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. विरोधकांनी कृष्णा कारखान्याच्या रसायन व मळीमिश्रित पाण्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप केला. अध्यक्ष अविनाश भोसले यांनी मात्र, या घटनेशी आमच्या कारखान्याचा काहीही संंबंध नाही, या परिसरात अनेक उद्योग, कारखाने आहेत. त्यांच्याबद्दल न बोलता केवळ आमच्या कारखान्यावर दोषारोप करू नयेत, असे प्रत्युत्तर दिले आहे.