कृष्णा परतली पात्रात, चार दिवसांनी महापूर ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST2021-07-28T04:27:44+5:302021-07-28T04:27:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : तब्बल चार दिवसांच्या मुक्कामानंतर कृष्णा नदी मंंगळवारी शहरातून पात्रात परतली. शिवाजी पुतळा परिसराचा अपवाद ...

कृष्णा परतली पात्रात, चार दिवसांनी महापूर ओसरला
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तब्बल चार दिवसांच्या मुक्कामानंतर कृष्णा नदी मंंगळवारी शहरातून पात्रात परतली. शिवाजी पुतळा परिसराचा अपवाद करता सर्व भाग खुले झाले.
पुराच्या तडाख्यानंतर पूरग्रस्त भागात आता साफसफाईला वेग आला आहे. अनेक इमारतींच्या तळघरात पाणी साचले असून उपशासाठी शहरभर पंप सुरु आहेत. प्रामुख्याने हरभट रस्ता, कापड पेठ, गणपती पेठ, मारुती चौक ते बसस्थानक, पटेल चौक, बुरुड गल्ली येथे पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे शहरभर धडधडणाऱ्या पंपांचा आवाज ऐकू येत आहे. व्यापारी पेठांत दुकानांतून पुराने खराब झालेले साहित्य बाहेर काढून टाकण्याचे काम सुरु आहे. स्वच्छतेसाठी मुंबई महापालिकेने वाहने व कर्मचारी पाठवले आहेत. व्यावसायिकांनी पुराचा अंदाज घेऊन दुकाने पूर्वीच रिकामी केली, त्यामुळे नुकसानीची तीव्रता तुलनेने कमी दिसत आहे. घरांची पडझडही तुलनेने कमी आहे.
प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल करुन दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती, तरीही पुरामुळे बाजारपेठांत दुकाने बंदच राहिली.
शिवाजी पुतळ्याला पाण्याचा वेढा कायम आहे. त्यामुळे गावभाग, शिवाजी मंडई, बसस्थानकाकडे जाणारे रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत. मंगळवारी दिवसभर या पाण्यात नागरिकांचे नौकानयन सुरु होते.
चौकट
हे भाग झाले रिकामे
गणपती पेठ, कापड पेठ, हरभट रस्ता, कोल्हापूर रस्ता, १०० फुटी रस्ता, पटेल चौक, रतनशीनगर, वखारभाग, बसस्थानक, फौजदार गल्ली, राजवाडा, गावभाग, टिळक चौक, गणपती मंदिर, बुरुड गल्ली, आयुक्त बंगला, सर्किट हाऊस हा परिसर पूरमुक्त झाला आहे. सांगली -कोल्हापूर रस्ता व आयर्विन पुलावरुन वाहतूक सुरु झाली आहे.
चौकट
येथे आहे पाणी
शिवाजी पुतळा, शिवशंभो चौक तथा बायपास रस्ता, वैरण बाजार तथा गणपती घाट येथे पुराचे पाणी कायम आहे. टिळक चौक, आमराईसह काही सखल भागात पाणी साचले असले तरी तेथे पूरस्थिती नाही.