जिल्ह्याचा कृष्णाकाठ ‘मगरमिठी’त...

By Admin | Updated: April 23, 2015 00:41 IST2015-04-22T22:41:25+5:302015-04-23T00:41:34+5:30

वीस दिवसांत दोघांचे बळी : वन कर्मचाऱ्यांची गस्त सुरू, नागरिकांतून वनविभागाबाबत संताप

In the Krishna Krishna temple of Magarimathi ... | जिल्ह्याचा कृष्णाकाठ ‘मगरमिठी’त...

जिल्ह्याचा कृष्णाकाठ ‘मगरमिठी’त...

सांगली : तीन महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पात्रात महाकाय मगरींचा वावर वाढला असून, गेल्या वीस दिवसांत या मगरींनी दोघांचा बळी घेतला आहे. मगरींच्या वावराने कृष्णाकाठ भेदरला असून, संतप्त नागरिकांशी आता वन विभागाला तोंड द्यावे लागत आहे. या मगरींना पकडण्यासाठी नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तोपर्यंत मगरींच्या वास्तव्याच्या ठिकाणी वन कर्मचाऱ्यांची गस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील औदुंबर, ब्रह्मनाळ, भिलवडी या कृष्णाकाठच्या गावांमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून मगरींचे वास्तव्य आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या मगरी आक्रमक झाल्या असून, त्यांनी नागरिकांवर हल्ले सुरू केले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सांगली शहरालगतच्या नदीपात्रातही मगरींचे दर्शन नियमित होत आहे.
सोमवारी चोपडेवाडी (ता. पलूस) येथे नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी गेलेला शाळकरी मुलगा अजय शहाजी यादव (वय १३) याला मगरीने ओढून नेले. मंगळवारी त्याचा मृतदेह सापडला. त्यापूर्वी भिलवडीजवळ २९ मार्चला जळगाव जिल्ह्यातील ऊसतोड मजूर वसंत मोरे (वय ३६) या मजुराचा मगरीच्या हल्ल्यात बळी गेला होता. त्यामुळे कृष्णाकाठावर भीतीचे वातावरण पसरले आहे. नदीमध्ये पोहणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात घटली आहे. शेतीला पाणी देण्यासाठी, मोटार सुरू करण्यासाठी नदीकाठी जाणाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. घाटावर, पाणवठ्यावर धुणे धुण्यासाठी जाणाऱ्या महिलांची संख्याही आता घटली आहे.
पलूस तालुक्यातील व सांगली शहर परिसरात मगरींचे वास्तव्य असणारी दहा ठिकाणे आता वन विभागाने निश्चित केली आहेत. सांगलीतील जॅकवेल परिसर, औदुंबर, ब्राह्मनाळ, चोपडेवाडी, भिलवडीचा त्यात समावेश आहे. तेथे आता दिवसभरासाठी वन कर्मचारी गस्त घालणार आहेत.
मगरीच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचे नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नदीकाठावरील बेसुमार वाळू उपशामुळे मगरींचे वास्तव्य धोक्यात आले आहे, असेही आता सांगण्यात येत आहे. परिणामी त्या काठाकडे येत आहेत. त्यातच मगरींचा सध्या प्रजनन काळ असल्यामुळे हल्ले वाढले असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)


मगरी पकडण्याचे आदेश आले?
नागपूर येथील मुख्य वनसंरक्षकांनी कृष्णा नदीपात्रातील मगरींना पकडून त्यांना चांदोली जलाशयात सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसा आदेश सांगली जिल्ह्याच्या वन विभागाला प्राप्त झाला आहे, अशी माहिती नगरसेविका स्वरदा केळकर यांनी दिली. हा आदेश वनअधिकारी एस. एम. भोसले यांना मिळाला होता, पण त्यांची बदली झाल्याने हा आदेश पुन्हा बारगळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मगरी पकडण्यासाठी परवानगी मागणारा प्रस्ताव सांगली जिल्हा वनअधिकाऱ्यांकडून पाठविण्यात आला आहे. तत्पूर्वी मगरींची संख्या मोजण्याचीही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.


मगरी पकडण्यासाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. यासाठी आम्ही नागपूर येथील प्रधान वनसंरक्षकांकडे परवानगी मागितली आहे. तोपर्यंत मगरींचे वास्तव्य असणाऱ्या दहा ठिकाणी वन कर्मचारी दिवसभर पहारा देणार आहेत. गावागावामध्ये जनजागृतीची मोहीमही आता सुरू करण्यात आली आहे. मगरींची गणना करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे.
- समाधान चव्हाण, विभागीय वन अधिकारी, सांगली.

Web Title: In the Krishna Krishna temple of Magarimathi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.