क्रांतिवीरांची महती पश्चिम महाराष्ट्रातच राहिली
By Admin | Updated: March 23, 2015 00:43 IST2015-03-22T23:55:47+5:302015-03-23T00:43:22+5:30
उज्ज्वल निकम : तृतीय स्मृतिदिनानिमित्त नागनाथअण्णांना वाळवा येथे आदरांजली

क्रांतिवीरांची महती पश्चिम महाराष्ट्रातच राहिली
वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा, क्रांतिसिंह नाना पाटील यांची महती पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली. योग्यपद्धतीने हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशपातळीवर मांडणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले.हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने आयोजित क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या तृतीय स्मृतिदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत, माजी सहकारमंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते. व्यासपीठावर संकुलाच्या मार्गदर्शिका कुसूमताई नायकवडी, कार्यक्रमाचे निमंत्रक वैभव नायकवडी, अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम, प्रतापसिंह जाधव उपस्थित होते.अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात स्वातंत्र्याची धगधगती मशाल क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनीच पेटविली. परंतु आजही नाना पाटील व क्रांतिसिंह डॉ. नागनाथअण्णा पश्चिम महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहेत. ते नागपूरला माहिती नाहीत. ते साऱ्या देशाला माहिती झाले पाहिजेत. तरच त्यांनी दीन-दलित, उपेक्षित, शोषित, पीडित, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी यांच्यासाठी केलेले काम सगळ्यांना समजेल. माझी आई विमलाताई आणि क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा एकाच शाळेत शिक्षण घेत होते. पुढे माझी आईसुध्दा क्रांतिकारी लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना मदत करू लागली. माझ्या आईच्या तोंडून बालपणापासूनच स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा इतिहास ऐकून व पुढे तो वाचून मला आजच्या गुंडांविरुध्द लढण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. आज तरुणांना गुन्हेगारीचे आकर्षण वाटू लागले आहे. समाजमनात वाढलेले हे गुन्हेगारीचे आकर्षण दूर केले पाहिजे.
यावेळी कुसूमताई नायकवडी म्हणाल्या की, शेतकऱ्यांची मुले- बाळे भिक्षुकासारखी दुसऱ्याच्या दारात उभी आहेत. तरी आपले सरकार डोळे उघडून मदत देण्यास तयार नाही.
प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षात देशातील तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पुरोगामी म्हणून ढोल वाजवणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील ६३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
निमंत्रक वैभव नायकवडी यांनी स्वागत केले. यावेळी नायकवडी म्हणाले, अवकाळी पाऊस, ऊस दराचे एफआरपी, त्यातच साखर धंदा अडचणीचा, त्यामुळे शेतकरी जगतोय की मरतोय, हे कळेनासे झाले आहे.
सभेपूर्वी क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी इनडोअर स्पोर्टस् हॉलचे उद्घाटन निकम यांच्याहस्ते करण्यात आले. मान्यवरांनी समाधीस्थळी पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. नागनाथअण्णांच्या स्मारकासाठी शिराळा तालुक्यातील चरणच्या सरपंच सोनाली बाळासाहेब नायकवडी यांनी एक लाख रुपयांचा धनादेश वैभव नायकवडी यांच्याकडे सुपूर्द केला.
सभेला गौरव नायकवडी, अपर्णा साळुंखे, सोनाली नायकवडी, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, किरण नायकवडी, भगवान पाटील, जयवंत अहिर, एन. एम. मंडलिक उपस्थित होते. (वार्ताहर)