सांगली : उसनवारीतून घेतलेल्या रकमेपोटी बोगस धनादेश देऊन मावसभावाची फसवणूक केल्याबद्दल नेहा राजेंद्र संकपाळ (रा. कसबा बावडा, कोल्हापूर) या महिलेस ३ महिने साधी कैद व २ लाख ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा भोगण्याचा आदेश दिला. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी रोहिणी सं. पाटील यांनी हा निकाल दिला.नेहा संकपाळ यांचा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. तर फिर्यादी सागर श्रीकांत डुबल (रा. लक्ष्मीनगर, सांगली) हा त्यांचा मावसभाऊ आहे. व्यवसायामध्ये आर्थिक अडचण आल्याने नेहा यांच्याकडे गुंतवणूकदारांनी तगादा लावला होता. त्यामुळे भावसभाऊ सागर याच्याकडून उसनवार पैसे मागितले.सागर याने नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याचा मित्र सागर गोसावी याच्याकडून उसनवार स्वरूपात १ लाख ५० हजार रुपये घेऊन नेहा यांना दिले होते. तीन महिन्यात रक्कम परत करण्याची ग्वाही दिली. मुदत संपल्यानंतर सागर याने पैशाची विचारणा करूनही रक्कम परत दिली नाही.नेहा यानी उसनवार रकमेपोटी धनादेश दिला. सागर याने धनादेश बँकेतील खात्यावर जमा केला. नेहा यांच्या खात्यावर रक्कम नसल्यामुळे धनादेश न वठता परत आला. त्यामुळे सागर याने न्यायालयामध्ये दावा दाखल केला. फिर्यादीतर्फे ॲड. एस.के. सनदी व ॲड. एच.डी. जावीर यांनी काम पाहिले. त्यानुसार न्यायदंडाधिकारी पाटील यांनी नेहा यांना शिक्षा व दंड सुनावला. दंडाची रक्कम सागर याला भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.
बोगस धनादेशबद्दल कोल्हापूरच्या महिलेस शिक्षा, ३ महिने साधी कैद, २ लाख ५० हजार रुपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:50 IST