कोल्हापूर, सांगलीकरांना आता पुणे स्टेशनमध्ये ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:05+5:302021-09-22T04:29:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पुणे स्थानकातील रेल्वेगाड्यांची कोंडी कमी करण्यासाठी घोरपडीमध्ये क्वॉड लाईनचा (बायपास) प्रस्ताव मध्य रेल्वेच्या ...

Kolhapur, Sanglikars now have 'no entry' in Pune station | कोल्हापूर, सांगलीकरांना आता पुणे स्टेशनमध्ये ‘नो एन्ट्री’

कोल्हापूर, सांगलीकरांना आता पुणे स्टेशनमध्ये ‘नो एन्ट्री’

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पुणे स्थानकातील रेल्वेगाड्यांची कोंडी कमी करण्यासाठी घोरपडीमध्ये क्वॉड लाईनचा (बायपास) प्रस्ताव मध्य रेल्वेच्या विचारात आहे, त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरसह दक्षिणेकडून जाणाऱ्या प्रवाशांना आता पुणे स्थानकात उतरता येणार नाही. घोरपडी किंवा हडपसरला उतरावे लागेल.

पुणे स्थानकात फक्त सहा फलाट आहेत. जागेअभावी विस्तारावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे घोरपडी स्थानकात क्वॉड लाईनचा प्रस्ताव पुढे आला आहे. घोरपडी स्थानक ऑक्टोबर २०१९ मध्ये बंद करण्यात आले. आता तेथे एक अतिरिक्त फलाट तयार केला जाईल. कोल्हापूर-सांगलीसह दक्षिणेकडून जाणाऱ्या रेल्वे पुण्याऐवजी घोरपडीमध्येच थांबतील. प्रवाशांच्या चढ-उतारानंतर हडपसरमार्गे दौंडला व तेथून उत्तरेला मार्गस्थ होतील. त्यामुळे प्रवाशांना घोरपडीलाच उतरावे लागेल. तेथून पुणे स्थानक अवघ्या दोन-तीन किलोमीटरवर असल्याने प्रवाशांना फार त्रास होणार नाही, असा रेल्वेचा दावा आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या मात्र पुणे स्थानकातच थांबतील. बायपास लाईनचा प्रयोग दौंड स्थानकात वर्षभरापूर्वीच झाला आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्या दौंड स्थानकात न थांबता पुढे सुमारे दीड किलोमीटरवर थांबतात. तेथे इंजिन बदलावे लागत नसल्याने सुमारे अर्धा तास वेळेची बचत झाली आहे.

चौकट

या गाड्या पुणे स्थानकात जाणार नाहीत

महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोल्हापूर-निजामुद्दीन, म्हैसूर-निजामुद्दीन, गोवा एक्स्प्रेस आदी गाड्या पुणे स्थानकात जाणार नाहीत, घोरपडीमधूनच नागपूर, दिल्लीकडे वळतील.

चौकट

मिरजेत वर्षाला ६००० तास वाया

सोलापूर व बेंगलोरकडून कोल्हापूरला येणाऱ्या रेल्वेगाड्या इंजिनाची दिशा बदलण्यासाठी मिरजेत थांबतात. त्यासाठी अर्धा तासांचा वेळ जातो. डिझेलही मोठ्या प्रमाणात खर्ची पडते. प्रवासी आणि मालगाड्यांच्या इंजिन बदलासाठी मिरजेत वर्षभरात हजार तासांचा वेळ वाया गेल्याचे रेल्वेचे निरीक्षण आहे. त्यावर उपाय म्हणून कृष्णाघाट रेल्वे गेटपासून स्वतंत्र बायपास लाईनचा (क्वाड) प्रस्ताव आहे. गेटपासून निघालेली लाईन कोल्हापूर रेल्वे चाळीजवळ कोल्हापूर लोहमार्गाला जोडली जाईल. त्यामुळे काही गाड्या, विशेषत: मालगाड्यांना मिरज स्थानकात जाण्याची गरज राहणार नाही. इंजिनही बदलावे लागणार नसल्याने वेळ व डिझेलची बचत होईल.

Web Title: Kolhapur, Sanglikars now have 'no entry' in Pune station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.