कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसची ५० वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:28 IST2021-05-12T04:28:32+5:302021-05-12T04:28:32+5:30
मिरज : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसने मंगळवारी ५० वर्षे पूर्ण केली. सलग ५० वर्षे धावणारी ही रेल्वे ५० व्या ...

कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसची ५० वर्षे पूर्ण
मिरज : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसने मंगळवारी ५० वर्षे पूर्ण केली. सलग ५० वर्षे धावणारी ही रेल्वे ५० व्या वर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे स्थानकातच थांबून आहे.
दि. ११ मे १९७१ रोजी सुरू झालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी अत्यंत सोयीची असल्याने वर्षातील बाराही महिने फुल्ल असते. कोल्हापूर ते मुंबई हे ५१८ किलोमीटरचे अंतर १८ स्थानके ओलांडत ११ तासात पूर्ण करणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस दररोज सकाळी साडेसात वाजता मुंबईत व कोल्हापुरात पोहोचते. सांगली, कोल्हापुरात येणारे सेलिब्रिटी, राजकारणी आमदार, खासदार महालक्ष्मी एक्स्प्रेसनेच ये-जा करतात. कोल्हापूर, मिरज व सांगलीकरांसाठी लाईफलाईन ठरलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने मंगळवारी ५० वर्षे पूर्ण केली.
कोरोनामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन असल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेससह बहुतांश एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे सुवर्णमहोत्सवात पदार्पण करणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस स्थानकातच थांबून आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळाली असून मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांची पसंती महालक्ष्मी एक्स्प्रेसलाच आहे.
चाैकट
दाेन वर्षांपूर्वी महापुरात अडकली
प्रवाशांच्या या लाडक्या एक्स्प्रेसचा ५० वर्षांत एकही मोठा अपघात घडलेला नाही. दोन वर्षापूर्वी कर्जतजवळ बदलापूर व वांगणी स्थानकांदरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात रात्रभर अडकली होती. एनडीआरएफच्या पथकाने त्यातील एक हजार प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले होते.