कोल्हापूरनेही सांगलीचा ऑक्सिजन पुरवठा रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:28 IST2021-05-09T04:28:19+5:302021-05-09T04:28:19+5:30
सांगली : कर्नाटकनंतर कोल्हापूर जिल्ह्यानेही सांगलीचा ऑक्सिजन पुरवठा रोखला आहे. पुण्यातूनही शनिवारी पुरेसा पुरवठा होऊ शकला नाही. यामुळे सांगलीत ...

कोल्हापूरनेही सांगलीचा ऑक्सिजन पुरवठा रोखला
सांगली : कर्नाटकनंतर कोल्हापूर जिल्ह्यानेही सांगलीचा ऑक्सिजन पुरवठा रोखला आहे. पुण्यातूनही शनिवारी पुरेसा पुरवठा होऊ शकला नाही. यामुळे सांगलीत टंचाईस्थिती कायम असून ऑक्सिजनसाठी धवपळ कायम आहे.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी शनिवारी सकाळीच जिल्ह्यात ऑक्सिजन टंचाई नसल्याचा निर्वाळा दिला होता, त्यानंतर काही वेळातच कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी निर्बंधाचे आदेश जारी केले. आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता त्यांना पुरेशा ऑक्सिजनची गरज आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात २७५० रुग्णांना ऑक्सिजन पुरविला जात आहे. त्यांना तुटवडा भासू नये याची दक्षता आवश्यक आहे. त्यामुळे कोल्हापुरातील कंपन्यांनी शेजारच्या अन्य जिल्ह्यांना ऑक्सिजन देऊ नये. शासनाने त्या-त्या जिल्ह्यांचा पुरवठा निश्चित केला आहे, त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यांनी ऑक्सिजनची व्यवस्था स्वतःच करणे अपेक्षित आहे. कोल्हापुरातून ऑक्सिजन बाहेर दिल्यास कारवाई केली जाईल.
कोल्हापुरातील देवी, महालक्ष्मी ऑक्सिजन, के. धवल, कोल्हापूर ऑक्सिजन आणि महालक्ष्मी गॅसेस या सहा कंपन्यांवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
दरम्यान, सांगलीसाठी पुण्याहून पुरवठा निश्चित केला असला तरी सुमारे दहा टन ऑक्सिजन कोल्हापुरातून येत होता. सांगली सिव्हिललादेखील मिळायचा, तो आता थांबला आहे. पुण्यातून रात्री उशिरा एक टँकर येण्याच्या मार्गावर होता. तोपर्यंत रुग्णालयांची तारांबळ उडाली होती, काही रुग्णालयांत रात्री आठ वाजता तीन-चार तासांपुरताच ऑक्सिजन शिल्लक होते.
चौकट
सिंधुदुर्गचा पुरवठाही थांबला
कोल्हापुरातून सांगलीसह सिंधुदुर्ग, सतारा, रत्नागिरीलाही ऑक्सिजन मिळायचा. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तोदेखील थांबला आहे.
----------------------------