कोकळेचे ग्रामसेवक अहिरे यांची अखेर बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:36+5:302021-08-14T04:32:36+5:30
ग्रामसेवक अहिरे कोकळे गावात काम करताना नागरिकांशी उद्धटपणे वागून नागरिकांना त्रास देत होते. त्यांच्या मनमानी कारभाराने विकासकामांवर गंभीर परिणाम ...

कोकळेचे ग्रामसेवक अहिरे यांची अखेर बदली
ग्रामसेवक अहिरे कोकळे गावात काम करताना नागरिकांशी उद्धटपणे वागून नागरिकांना त्रास देत होते. त्यांच्या मनमानी कारभाराने विकासकामांवर गंभीर परिणाम झाला होता. ग्रामपंचायतींमध्ये ते कधीही वेळेवर हजर राहत नव्हते, त्यामुळे मागच्या आठवड्यात त्यांची बदली व्हावी म्हणून अंकुश कांबळे यांच्यासह नागरिक कवठेमहांकाळच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार होते. अहिरे यांच्या विरोधात नागरिकांनी निवेदने देऊन उपोषणाचा इशारा दिला होता.
शनिवार, दि. १४ तारखेला अहिरे यांची बदली झाली नाही तर, अंकुश कांबळे व नागरिक उपोषण करणार होते. परंतु शुक्रवारी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या दालनात गटविकास अधिकारी कणसे, विस्तार अधिकारी शिर्के, धनाजीराव भोसले, अंकुश कांबळे यांची बैठक होऊन या बैठकीत कणसे यांनी ग्रामसेवक अहिरे यांची आगळगाव या मूळ सजात बदली केल्याचे सांगितले. कणसे यांच्या स्वाक्षरीने अहिरे यांची बदली केल्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर पोलिसांनी कांबळे यांच्याकडून उपोषण मागे घेतल्याचा जबाब घेतला. आता कोकळ्याचे ग्रामसेवक म्हणून बुरुटे यांची नियुक्ती केल्याचे पत्रही देण्यात आले आहे.
चौकट
ग्रामसेवक अहिरे यांच्यामुळे विकास खुंटला होता. त्यांच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. नवीन ग्रामसेवकांना बरोबर घेऊन यापुढे गावच्या विकासावर भर दिला जाईल, अशी प्रतिक्रिया कोकळेच्या सरपंच सुवर्णा धनाजीराव भोसले यांनी व्यक्त केली.