सांगलीत तरुणावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:39+5:302021-03-24T04:25:39+5:30
सांगली : शहरातील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या मशिदीच्या समोरील चौकात चाकूहल्ला करून तरुणास जखमी करण्यात आले. विनोद भगवान सावंत ...

सांगलीत तरुणावर चाकूहल्ला
सांगली : शहरातील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या मशिदीच्या समोरील चौकात चाकूहल्ला करून तरुणास जखमी करण्यात आले. विनोद भगवान सावंत (वय ३५, रा. इंदिरानगर, सांगली) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी संशयित दत्ता शरणाप्पा सुतार (वय २७, रा. इंदिरानगर, सांगली) याच्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी विनोद सावंत आणि संशयित दत्ता सुतार हे दोघे इंदिरानगर येथे राहतात. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास सावंत हा त्याचे कामगार अविनाश लोंढे आणि मिस्त्री शिवा कांबळे यांच्यासह निघाले होते. ते सावंत प्लॉट परिसरातील मशिदीसमोरील चौकात आले. यावेळी संशयित सुतार हा तेथे होता. त्याने सिगरेट ओढल्यानंतर सिगरेटचा धूर सावंतच्या तोंडावर सोडला. सावंतने तू सिगरेटचा धूर तोंडावर का सोडलास, अशी विचारणा सुतारला केली. यावेळी सुतारने सावंतला तुला जास्त मस्ती आली आहे काय? असे म्हणून जवळ असलेला चाकू काढून सावंतवर वार केला. सावंतच्या मानेवर आणि पोटावर वार झाले. यात सावंत जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी सावंत याने याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी दत्ता सुतार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.