पतंगरावांनी पैशाचा वापर केला
By Admin | Updated: May 17, 2015 01:19 IST2015-05-17T01:19:14+5:302015-05-17T01:19:14+5:30
विलासराव जगताप : सर्वसाधारण गटात चिंध्या कशा झाल्या?

पतंगरावांनी पैशाचा वापर केला
सांगली : जिल्हा बँक निवडणुकीत मर्यादित मतदारसंख्या असलेल्या सोसायटी गटात पैशाच्या बळावर मते फिरवता येतात, म्हणून पतंगराव कदम यांनी केवळ ‘अ’ गटातच लक्ष घातले. त्याठिकाणी पैशाचा वापर करून त्यांनी काही जागा जिंकल्या, असा आरोप भाजपचे आ. विलासराव जगताप यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केला.
ते म्हणाले की, पतंगरावांचे राजकारण पै-पाहुण्यांच्या पलिकडे कधी गेले नाही. जिल्हा बँक निवडणुकीत त्यांचेच नातेवाईक सोसायटी गटातून उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी धनशक्ती पणाला लावली. दुसरे कोणी उमेदवार असते, तर त्यांनी इतकी मेहनत घेतली नसती. नात्यातील लोकांसाठी त्यांनी जनसुराज्य व राष्ट्रवादीची मते पैशाच्या जोरावर फोडली. पतंगरावांना ‘जनसुराज्य’चे नेते विनय कोरे यांच्या भेटीसाठी लाचार व्हावे लागले. पैशासाठी मतदारांना लाचार करताना तेसुद्धा लाचार झाले. या गोष्टीतच आमचे यश आहे. वैयक्तिक सूडभावनेतून त्यांनी आजवर राजकारण केले आहे.
जत तालुक्यातील पतंगरावांच्या गटाचे नेते कमकुवत आहेत. यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये विक्रम सावंत यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे सोसायटी गटातील या विजयाने जग जिंकल्याचा किंवा आकाश हाताला आल्याचा आव त्यांनी आणू नये. पतंगरावांच्या लोकांनी लोकशाही मार्गाने कोणत्याही दबावतंत्राचा, पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकली असती, तर त्यांच्या विजयाचे कौतुक केले असते. पण, आजवर त्यांचे राजकारण सरळमार्गाने कधीही झालेले नाही.
पैशाच्या जोरावरच पतंगराव राजकारण करीत असतात.
भारती विद्यापीठ, हॉस्पिटल व बाजारासाठी त्यांनी अनेक ठिकाणच्या मोक्याच्या जागा बळकावल्या. विद्यापीठ व अन्य संस्थांसाठी ज्या जागा त्यांनी घेतल्या, त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली आहे. आगामी अधिवेशनातही जागांच्या या गंभीर प्रश्नावर आवाज उठविणार आहे, असे आ. जगताप यांनी सांगितले.
त्यांच्याच चिंध्या झाल्या
पतंगरावांनी सुरुवातीपासूनच जिल्हा बॅँक निवडणुकीत लक्ष घातले होते. मर्यादित मतदारसंख्या असलेल्या सोसायटी गटातच त्यांनी लक्ष घातले. ही मते पैशाच्या बळावर फोडणे शक्य होते. अन्य सर्वसाधारण गटात मतदारसंख्या अधिक असल्याने तेथे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे त्याठिकाणी त्यांच्याच पॅनेलच्या चिंध्या झाल्या. त्यांनी दुसऱ्याच्या चिंध्या करण्याची भाषा करू नये, असे मत जगताप यांनी व्यक्त केले.