विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST2021-09-19T04:26:35+5:302021-09-19T04:26:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील विष्णूअण्णा फळ मार्केटमधील स्वच्छतेकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसत ...

विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील विष्णूअण्णा फळ मार्केटमधील स्वच्छतेकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसत आहे. नवीन गाळ्यासमोरच घाणीचे ढीग पडल्यामुळे व्यापारी संतप्त झाले होते. ठेकेदाराने दोन दिवसांत घाण न उचलल्यास त्याचा ठेका रद्द करावा, अशीही व्यापाऱ्यांनी शनिवारी मागणी केली आहे.
विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये सध्या देशभरातून फळ, कांदा, बटाट्याची आवक होत आहे. रोज हजारो टन मालाची आवक होत असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. या ठिकाणी नियमित स्वच्छता झाली पाहिजे. म्हणून सांगली बाजार समितीने स्वच्छता आणि येथील घाण अन्य ठिकाणी टाकण्यासाठी ठेका दिला आहे. स्वच्छतेसाठी ठेकेदारास महिना ४० हजार रुपये आणि येथील घाण अन्य ठिकाणी टाकण्यासाठी महिना ३० हजार रुपये बाजार समिती देत आहे. या मोबदल्यात ठेकेदाराने रोज बाजार समिती परिसरातील स्वच्छता करणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या महिनाभरापासून ठेकेदाराकडून स्वच्छताही वेळेवर केली जात नाही. तसेच, येथील घाणही उचलून टाकली जात नाही. याबाबत बाजार समिती प्रशासनाकडे व्यापाऱ्यांनी तक्रार केली आहे. सहायक सचिव तानाजी पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, संबंधित ठेकेदारास स्वच्छता करण्याची सूचना दिली आहे. तरीही त्यांनी स्वच्छता केली नसून घाणही उचलली नाही. याबद्दल त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदाराचे बिलच काढले नाही.
बिल थांबविल्यानंतरही स्वच्छता करण्याऐवजी ठेकेदाराने राजकीय दबाव टाकून बिल काढण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. व्यापाऱ्यांनी स्वच्छता न करता ठेकेदारास बिल दिल्यास बेमुदत व्यापार बंद करण्याचा सहायक सचिवांना इशारा दिला आहे.
चौकट
ठेकेदाराचे दोन महिन्यांचे बिल रोखले : तानाजी पाटील
बाजार समितीत चांगल्या पद्धतीने स्वच्छता करण्याबाबत ठेकेदारास सूचना दिली आहे. तरीही त्यांनी स्वच्छता आणि घाण उचलून नेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच संबंधित ठेकेदाराचे गेल्या दोन महिन्यांचे बिल थांबविले आहे. बाजार समितीतील सर्व घाण हलविल्यानंतरच बिल देण्यात येईल, अशी सूचना ठेकेदाराला दिली आहे, अशी माहिती विष्णूअण्णा फळ मार्केटचे सहायक सचिव तानाजी पाटील यांनी दिली.