तीर्थक्षेत्र खरसुंडीत घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:24 IST2021-04-06T04:24:52+5:302021-04-06T04:24:52+5:30
खरसुंडी : तीर्थक्षेत्र खरसुंडी (ता. आटपाडी) येथे गावातील प्रमुख चौकात, मंदिर परिसर आणि गल्लीबोळातील गटारी तुंबल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावर ...

तीर्थक्षेत्र खरसुंडीत घाणीचे साम्राज्य
खरसुंडी : तीर्थक्षेत्र खरसुंडी (ता. आटपाडी) येथे गावातील प्रमुख चौकात, मंदिर परिसर आणि गल्लीबोळातील गटारी तुंबल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावर पसरून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासन मात्र नागरिकांना नागरी सुविधा देण्यात असमर्थ ठरत असून केवळ कर वसुलीत मग्न आहे. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी परिसरातील गटारी स्वच्छ करण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली असता त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामपंचायतीकडे कामगार संख्या अपुरी असून, योग्य नियोजन होत नसल्याने गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. काही वाॅर्डांत सहा ते सात महिने गटारी साफ करण्यासाठी कामगार जात नाहीत. त्यामुळे गटारी तुंबून दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी गटारी बुजून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना व नियोजन करून गावातील गटारी स्वच्छ कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
चौकट
नियोजनाचा अभाव
खरसुंडी हे आठ हजारांच्या वर लोकसंख्या असणारे गाव असून, स्वच्छतेबाबत ग्रामपंचायत प्रशासन गंभीर नाही. चार महिला व एक पुरुष असे स्वच्छता कर्मचारी आहेत. मात्र, कामाचे योग्य नियोजन नसल्याने काही वाॅर्डांची सहा-सहा महिने स्वच्छता होत नाही. त्यामुळे कचऱ्याचे ढीग साचत आहेत.