अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण, सुटका
By Admin | Updated: November 16, 2014 00:10 IST2014-11-16T00:10:49+5:302014-11-16T00:10:49+5:30
शिराळ्यातील घटना : विद्यार्थ्यास स्वारगेट बसस्थानकावर सोडले

अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण, सुटका
शिराळा : शाळेत सोडण्याच्या बहाण्याने आठवीत शिकणाऱ्या शाम चंद्रकांत दंडवते (वय १४) या विद्यार्थ्याचे मोटारीतून अपहरण करण्यात आल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी घडली होती. अपहरणकर्त्यांनी विद्यार्थ्यास पुणे येथे नेले. परंतु त्या ठिकाणी वाहनांची पोलीस तपासणी सुरू असल्याने त्यांनी विद्यार्थ्यास स्वारगेट बसस्थानकात सोडून पलायन केले. यामुळे सुदैवाने पुणे पोलिसांच्या मदतीने काल अपहरण झालेला शाम आज शनिवारी सुखरुप घरी पोहोचला.
शिराळा येथील पाडळी रस्त्यावर राहणारा शाम दंडवते (मूळ गाव अंत्री खुर्द, ता. शिराळा) हा शेतमजूर कुटुंबातील आहे. शुक्रवार, दि. १४ रोजी सकाळी साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे तो श्री सद्गुरू आश्रमशाळेत जाण्यासाठी निघाला होता. तो तडीचा कोपरा येथील चौकात आला असता, त्याच्याजवळ पांढऱ्या रंगाची चारचाकी येऊन थांबली. आत बसलेल्या तरुणाने त्यास तुला आम्ही गाडीने शाळेत सोडतो, असे सांगितले. शाम त्यांचे म्हणणे ऐकून गाडीत बसला. गाडीमध्ये पाच तरुणांसह आणखी एक लहान मुलगा होता. अंबामाता मंदिराजवळ आल्यावर शामने त्यांना माझी शाळा आली असून, गाडी थांबविण्यास सांगितले. परंतु गाडी न थांबता तशीच कोकरूड रस्त्यावरून पुण्याकडे निघाली. शाळेत न सोडल्याने शामने आरडाओरडा सुरू केला. परंतु गाडी टोलनाक्याव्यतिरिक्त कुठेही थांबविण्यात आली नाही.
गाडी पुण्यात आल्यावर स्वारगेटजवळ पोलिसांकडून गाड्यांची तपासणी सुरू होती. हे पाहिल्यावर आपले अपहरणाचे बिंग फुटेल, या भीतीने अपहरणकर्त्यांनी शामला स्वारगेटजवळ गाडीतून उतरविले आणि ते निघून गेले. नवीन शहरात आल्यामुळे शाम भांबावून गेला होता. तेथील काही महाविद्यालयीन तरुणांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने घडलेली हकीकत त्यांना सांगितली.
आज शनिवारी दुपारी शाम घरी आल्यावर आई आणि त्याच्या भावाने त्याला मिठी मारून हंबरडा फोडला. शाळेतील विद्यार्थ्यांनी शामला भेटण्यासाठी त्याच्या घरी गर्दी केली होती. या घटनेमुळे शिराळा शहरात विशेषत: पालकांच्यात घबराटीचे वातावरण आहे.
पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांकडून मदत$$्रिपुणे येथील महाविद्यालयीन तरुणांनी त्यास स्वारगेट पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेअकराच्यादरम्यान दूरध्वनीवरून शामच्या घरी फोन करून तो सुखरूप असल्याचे सांगितले. मध्यरात्री शामचे वडील तातडीने पुण्यास गेले. तेथे पोलिसांनी चौकशी करून त्यास वडिलांच्या स्वाधीन केले. आज शनिवारी दुपारी शाम घरी आल्यावर आई आणि त्याच्या भावाने त्याला मिठी मारून हंबरडा फोडला. शाळेतील विद्यार्थ्यांनी शामला भेटण्यासाठी त्याच्या घरी गर्दी केली होती.