अभयनगरात तरुणावर तलवारीने खुनीहल्ला
By Admin | Updated: May 24, 2014 00:42 IST2014-05-24T00:34:39+5:302014-05-24T00:42:39+5:30
तिघांवर गुन्हे : पूर्ववैमनस्यातून कृत्य

अभयनगरात तरुणावर तलवारीने खुनीहल्ला
सांगली : येथील अभयनगरातील झोपडपट्टीत राहणार्या महेश सुरेश शेंडे (वय २७) याच्यावर काल (बुधवार) तिघांनी पायावर तलवारीने हल्ला करून जखमी केले. शेंडे याला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिलीप घाडगे ऊर्फ गोसावी, अजित मोहिते व लव्हली गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश शेंडे हा काल रात्री दहाच्या सुमारास आपल्या घरी झोपला असताना दिलीप घाडगे, अजित मोहिते लव्हली गोसावी हे त्याठिकाणी आले. त्यांनी शेंडे याला घराबाहेर बोलावले. ‘तुला मस्ती आली आहे’ असे म्हणून त्याच्या दोन्ही पायांवर तलवारीने हल्ला केला. शेंडे आरडाओरडा करू लागल्यानंतर तिघेही तेथून फरारी झाले. शेंडे याला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, तिघेही हल्लेखोर फरार झाले आहेत. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, फरारी गुन्हेगार्यांच्या शोधासाठी पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत ते सापडले नव्हते. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार ए. एस. नलवडे करीत आहेत. (प्रतिनिधी)