उच्च शिक्षणाचा सुरू आहे खेळखंडोबा; शाळा सुरू, महाविद्यालयांबाबत मात्र चालढकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:00+5:302021-02-05T07:32:00+5:30
सांगली : कोरोनाचा प्रभाव कमी होताच मंदिरे, दुकाने, खेळ, आदींना सरकारने परवानगी दिली. मग महाविद्यालयांनीच काय घोडे मारले आहे? ...

उच्च शिक्षणाचा सुरू आहे खेळखंडोबा; शाळा सुरू, महाविद्यालयांबाबत मात्र चालढकल
सांगली : कोरोनाचा प्रभाव कमी होताच मंदिरे, दुकाने, खेळ, आदींना सरकारने परवानगी दिली. मग महाविद्यालयांनीच काय घोडे मारले आहे? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. दहा महिन्यांपासून महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे, त्याला सरकारच जबबादार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. जलतरण तलाव, मंदिरे, चित्रपटगृहे, मॉल, आदींना परवानगी मिळाली, महाविद्यालये मात्र अजूनही बंदच आहेत. ती सुरू करण्याविषयी शासकीय स्तरावर ठोस निर्णय होत नसून शिक्षण विभागही खेळखंडोबा करीत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
दहा महिन्यांपासून विद्यार्थी मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसले आहेत. अभियांत्रिकीचे विद्यार्थी तर सकाळी सातपासून संध्याकाळी सहापर्यंत मोबाईलमध्येच अडकून पडलेत. अभ्यासाचे होणारे नुकसान क्लासेसमधून भरून काढण्याची विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. सरकारच्या धरसोडीच्या वृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.
चौकट
महाविद्यालये बंद, तरीही कॅम्पसमध्ये वर्दळ
सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांचे डोळे महाविद्यालये सुुरू होण्याकडे लागून राहिले आहेत. महाविद्यालये सुरू नसली तरी प्रशासकीय कामे, प्राध्यापकांचे मार्गदर्शन यासाठी कॅम्पसमध्ये गर्दी वाढत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये बंदचा मोठा शैक्षणिक फटका बसला आहे. अभियांत्रिकी, आयटीआय, कायदा, वैद्यकीय, आदी शाखांच्या विद्यार्थ्यांची कसरत सुरू आहे.
पॉईंटर्स
एकूण महाविद्यालये - २१६
एकूण विद्यार्थी संख्या - ११५०००
कोट
सरकारने मद्यालये, मंदिरे, हॉटेल्स, व्यायामशाळांना परवानगी दिली. मग महाविद्यालयेच बंद का, असा आमचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी सरकार घेणार आहे काय, हेदेखील स्पष्ट झाले पाहिजे. पाचवी ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू झाले; त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयांचा निर्णय सरकारने त्वरित घ्यायला हवा.
- प्रतीक पाटील, अभाविप
कोट
महाविद्यालये बंद असल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला सरकारच जबाबदार आहे. महाविद्यालेय त्वरित सुरू झाली नाहीत तर आम्हाला आक्रमक व्हावे लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शैक्षणिक सत्र तातडीने सुरू केले पाहिजे.
- माधुरी लड्डा, अभाविप
कोट
कोरोनाविषयक खबरदारी घेऊन महाविद्यालये सुरू व्हायला हवीत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांनीही आरोग्याची काळजी घेत महाविद्यालयात उपस्थिती लावायला हवी.
- सौरभ पाटील, एनएसयूआय
कोट
ऑनलाईन शिक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे महाविद्यालये सुुरू व्हायला हवीत. खासगी क्लासेसना परवानगी देताना सरकारने महाविद्यालयांचाही विचार करायला हवा होता. कोरोना बहुतांश संपुष्टात आल्याने महाविद्यालयांचे दरवाजे उघडायला हवेत.
- श्रेयस मोहिते, विद्यार्थी
-------------