खरसुंडीत बारामतीच्या ट्रकचालकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:36 IST2018-07-04T23:36:16+5:302018-07-04T23:36:21+5:30

खरसुंडीत बारामतीच्या ट्रकचालकाचा खून
खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील घाणंद रस्त्यावर काशिनाथ महादेव गलांडे (वय ४४, रा. निरा-वागज, ता. बारामती, जि. पुणे) या ट्रक चालकाचा अज्ञाताने खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चिंचाळे येथील साठवण तलावात टाकून दिल्याची घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली.
बुधवारी दुपारी चिंचाळे साठवण तलावाच्या पुलावरून जाणाऱ्या लोकांना रस्त्यावर रक्त लागलेली चप्पल व पुलाच्या खाली पाण्यात केशरी रंगाचा प्लास्टिकचा कागद आणि दोरी दिसली. त्यामुळे लोकांनी खाली पाण्यात पाहिले असता मृतदेह दिसून आला. मृताच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर मार लागला होता. घटनेची माहिती पोलीसपाटील सचिन मंडले यांनी आटपाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढला. खिशात वाहनचालक परवाना मिळाल्याने मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह निरा-वागज येथील काशिनाथ गलांडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
गलांडे यांचा अज्ञाताने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलावरून साठवण तलावाच्या पाण्यात टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
लवकरच उलगडा
खरसुंडी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातून आलेल्या या ट्रक चालकाचा अज्ञाताने कशासाठी खून केला असावा, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, आटपाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेले खरसुंडी पोलीस दूरक्षेत्र कायमच बंद असल्याने घटनास्थळी आटपाडी पोलिसांना पोहोचण्यास वेळ लागला.