खरसुंडी बाजारात सात कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:30+5:302021-02-05T07:25:30+5:30
खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र खरसुंडी येथे पाैष यात्रेनिमित्त भरलेल्या खिल्लार जनावरे व शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात सात कोटी रुपयांची उलाढाल ...

खरसुंडी बाजारात सात कोटींची उलाढाल
खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र खरसुंडी येथे पाैष यात्रेनिमित्त भरलेल्या खिल्लार जनावरे व शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात सात कोटी रुपयांची उलाढाल झाली. या बाजारासाठी राज्यासह परराज्यांतील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धनाथाची पौष यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या आर्थिक उलाढालीचा विचार करून लोकप्रतिनिधींच्या विशेष प्रयत्नाने नियम व अटी घालून शेळ्या-मेंढ्या आणि खिलार जनावरांच्या बाजाराला परवानगी दिली होती.
खरसुंडी-नेलकरंजी रस्त्याच्या बाजूला गावाच्या बाहेर बाजार समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने यात्रा भरवण्यात आली. अनेक जिल्ह्यांतून जातिवंत खिलारी जनावर घेऊन शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने खरसुंडी येथे दाखल झाला होता.
तीस हजार जनावरांची आवक या बाजारात झाली होती. पुणे, सातारा , सोलापूर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने व्यापारीवर्गाने हजेरी लावली होती. खरेदी-विक्रीतून सुमारे सात कोटींची उलाढाल झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली होती. हॉटेल व इतर स्टॉलवर बंदी घालण्यात आली होती. शिवाय यात्रातळावर लाईट, पाणी आणि नागरी सुविधेची व्यवस्था बाजार समितीकडून करण्यात आली होती. आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी यात्रातळावर भेट देऊन व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.
चौकट
शेतकरी समाधानी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर जनावरांच्या बाजार यात्रेला बंदी असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोसळल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. खरसुंडी यात्रेत पशुधन खरेदी-विक्रीतून मोठमोठी आर्थिक उलाढाल झाल्याने समाधान व्यक्त केले.
फोटो-०२आटपाडी१.२.३.४