खानापुरात मामा-भाचीवर कोयत्याने हल्ला
By Admin | Updated: December 22, 2016 23:33 IST2016-12-22T23:33:11+5:302016-12-22T23:33:11+5:30
दोघेही गंभीर जखमी : हल्लेखोर युवक फरारी; कारण अस्पष्ट; रुग्णालयात दाखल

खानापुरात मामा-भाचीवर कोयत्याने हल्ला
विटा : खानापूर येथे युवकाने कोयत्याने केलेल्या खुनीहल्ल्यात मामा व भाची गंभीर जखमी झाले. पूनम नंदकुमार जाधव (वय २५, रा. मूळ गाव राजेवाडी, ता. आटपाडी) व तिचे मामा बाळकृष्ण किसन गवळी (५२, रा. खानापूर) अशी त्यांची नावे आहेत. हल्लेखोर योगेश विजय जाधव (रा. कुर्ली, ता. खानापूर) फरारी झाला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, एकतर्फी प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा आहे.
पूनम जाधव खानापूर येथे मामा बाळकृष्ण गवळी यांच्याकडे आजोळी राहण्यास आहे. गुरूवारी दुपारी एक वाजता कुर्ली येथील योगेश जाधव खानापुरात गवळी यांच्या घरी गेला होता. योगेश व पूनम यांच्यात बोलणे सुरू असताना, वाद झाल्याने योगेशने पूनमला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिचे मामा बाळकृष्ण भांडण सोडविण्यास गेले असता, योगेशने पहिल्यांदा बाळकृष्ण यांच्या उजव्या हातावर व पायावर धारदार कोयत्याने वार केले. त्याचवेळी त्याने पूनमच्याही डोक्यात व पाठीवर वार केले. त्यात बाळकृष्ण व पूनम गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर योगेशने तेथून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमी मामा व भाचीला विटा येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले व नंतर पुढील उपचारासाठी दोघांनाही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान, या हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, हा हल्ला एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चा खानापुरात आहे. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून पोलिस निरीक्षक अमोल शिंदे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
हल्लेखोराचा शोध सुरू...
मामा व भाचीवर धारदार कोयत्याने हल्ला केल्यानंतर हल्लेखोर योगेश जाधव घटनास्थळावरून फरारी झाला. हल्ल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी खानापूर व परिसरासह त्याच्या मूळ गावी कुर्ली येथे शोधमोहीम सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत तरी तो पोलिसांच्या हाती सापडला नव्हता. हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला, हे योगेशला ताब्यात घेतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.