खंडोबाचीवाडी पुलामध्ये अखेर मुरूमाचा भराव
By Admin | Updated: April 1, 2015 00:00 IST2015-03-31T22:53:09+5:302015-04-01T00:00:54+5:30
जलसंपदा विभागाला आली जाग : ठेकेदाराचे धाबे दणाणले--लोकमतचा दणका

खंडोबाचीवाडी पुलामध्ये अखेर मुरूमाचा भराव
भिलवडी : पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी-धनगाव रस्त्यादरम्यान जलसंपदा विभागाच्यावतीने अकरा लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलामध्ये मुरूमाऐवजी ठेकेदाराने चक्क मातीचाच भराव केला होता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसारित करून ठेकेदाराचे बिंग फोडले होते. यामुळे खडबडून जाग्या झालेल्या जलसंपदा विभागाने व ठेकेदाराने भरलेला मातीचा भराव काढून नव्याने मुरूम भरण्यास सुरुवात केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांच्यासह क ार्यकर्त्यांनी गुरुवार, दि. २६ रोजी समक्ष भेट देऊन या कामाची पाहणी केली. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने धनगाव व खंडोबाचीवाडी या दोन गावातील क्षारपड शेतजमिनीमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चर खुदाईचे काम सुरू आहे. या चरीदरम्यान ज्या ठिकाणी रस्ता आहे, तेथे क्रॉस ड्रेनेज व पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. ओढ्यामध्ये सिमेंटच्या मोठ्या पाईप घालून त्यावर मुरूमाचा भराव करणे अपेक्षित असताना, संबंधित ठेकेदाराने पाईपवर दहा ते बारा फूट उंचीवर जे.सी.बी.ने शेजारच्या ओढ्यामधील काळी माती काढून त्याचा भराव केला व वरील बाजूस मुरूम पसरून ठेवला. रस्त्याच्या दोन्ही बाजूस दगडी बांधकाम व पिचिंग करणे गरजेचे असताना, केवळ मातीच्या भरावावर काम उरकण्यात आले
होते.
संदीप राजोबा यांच्यासह खंडोबाचीवाडीचे सरपंच धोंडीराम मगदूम, अशोक मगदूम, चंद्रकांत कापसे, दिलीप भस्मे आदी कार्यकर्त्यांनी या कामाची पाहणी करुन त्याची कानउघाडणी केली. ठेकेदाराने चूक कबूल करून, माती काढून मुरूम भरून परत कामकाज करण्याचे आश्वासन दिले होते. या कामाचा दर्जा न सुधारल्यास स्वाभिमानीने आंदोलनाचाही इशारा दिला होता.
‘लोकमत’मधून २७ रोजी प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराने शनिवारी रात्री उशिरा जे.सी.बी.ने पुलामध्ये भरलेला मातीचा भराव काढून मुरूमाचा भराव करण्यास सुरुवात केली. आज (मंगळवारी) दिवसभर ठेकेदाराची माणसे मुरूम भरण्याच्या कामात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले. (वार्ताहर)
शेतकऱ्यांतून ‘लोकमत’चे अभिनंदन
शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असताना भ्रष्ट ठेकेदार प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून दर्जाहीन कामे करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. यावेळी ‘लोकमत’ने शेतकऱ्यांच्या हिताचे वृत्त देऊन सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल खंडोबाचीवाडी, धनगाव गावातील शेतकऱ्यांतून ‘लोकमत’चे अभिनंदन करण्यात येत आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत दर्जाबाबत शेतकऱ्यांनी जागरुक राहण्याचे आवाहनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले.