खंडोबाचीवाडीत शेतमजूर महिलेचा निर्घृण खून

By Admin | Updated: September 5, 2016 00:18 IST2016-09-05T00:18:10+5:302016-09-05T00:18:10+5:30

कोयत्याने हल्ला : शिर धडावेगळे केले

Khandobachivadhi woman's deadly blood | खंडोबाचीवाडीत शेतमजूर महिलेचा निर्घृण खून

खंडोबाचीवाडीत शेतमजूर महिलेचा निर्घृण खून

भिलवडी : खंडोबाचीवाडी (ता. पलूस) येथे वर्षा विश्वास शिंदे (वय ४५) या शेतमजूर महिलेचा अज्ञातांनी कोयत्याने गळा चिरून शिर धडावेगळे करून निर्घृण खून केला. याबाबत तिचे पती विश्वास अण्णा शिंदे (वय ६०) यांनी भिलवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
भिलवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वर्षा शिंदे या पतीसह खंडोबाचीवाडी येथील शिंदे मळ्यात राहतात. रविवारी सकाळी ७ वाजता घरातील स्वयंपाक आटोपून त्या जुन्या शिंदे मळ्यामधील एका शेतात शेतमजुरीसाठी गेल्या होत्या. काम संपल्यानंतर त्या शेजारील शेतात चवळीच्या शेंगा तोडण्यासाठी जाणार होत्या. दुपारी कामाच्या सुटीनंतरही त्या घरी परतल्या नसल्याने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पती विश्वास शिंदे त्यांना उशीर का झाला, हे पाहण्यासाठी शेतात गेले. यावेळी त्यांना शेतात वर्षा यांचा मृतदेह शिर धडावेगळे असलेल्या स्थितीत आढळून आला.
या प्रकारामुळे विश्वास शिंदे घाबरून गेले. त्यांनी तातडीने भिलवडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. भिलवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हल्लेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने गळा चिरून शिर धडावेगळे के ल्याचे दिसून आले.
रात्री उशिरा तासगावचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी सांगलीहून पाचारण केलेल्या श्वानपथकामार्फत हल्लेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला महिलेचा खून झाल्याने भिलवडी परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Khandobachivadhi woman's deadly blood