खंडेराजुरी आरोग्य केंद्राचे घाईगडबडीत उदघाटन!
By Admin | Updated: August 11, 2014 00:16 IST2014-08-10T23:34:57+5:302014-08-11T00:16:47+5:30
सत्ताधाऱ्यांचा बहिष्कार : कार्यक्रमाला पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती

खंडेराजुरी आरोग्य केंद्राचे घाईगडबडीत उदघाटन!
मालगाव : खंडेराजुरी (ता. मिरज) येथे पालकमंत्री पतंगराव कदम यांच्याहस्ते घाईगडबडीत पार पडलेल्या आरोग्य केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमावर ग्रामपंचायतीमधील नाराज सत्ताधारी राष्ट्रवादी व भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला. सरपंच व उपसरपंचांच्या उपस्थितीशिवाय हा कार्यक्रम पार पडला.
खंडेराजुरी येथे ७० लाख रुपये खर्च करून नव्याने आरोग्य केंद्र बांधण्यात आले आहे. बांधकामाच्या दर्जाविषयी गाजावाजा झालेले हे आरोग्य केंद्र उदघाटनाच्या प्रतीक्षेत होते. प्रशासकीय पातळीवर पालकमंत्री पतंगराव कदम यांच्याहस्ते उदघाटनाचे नियोजन करण्यात आले. या नियोजनामुळे गोंधळ निर्माण झाला. आरोग्य केंद्राच्या नियोजनाने उदघाटन करण्याचे ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे धोरण होते. तत्पूर्वीच पालकमंत्री पतंगराव कदम यांच्याहस्ते आरोग्य केंद्राचे उदघाटन करण्यात आले. घाईगडबडीत उदघाटनाचा घाट घातल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर होता. अशात कार्यक्रमादिवशीच निमंत्रण दिले गेल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी व भाजप युतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह नेत्यांनी या कार्यक्रमास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेऊन बहिष्कार घातला.
पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंचांना कार्यक्रमास उपस्थित रहाण्याबाबत विनंती केली; मात्र संतप्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाने ही विनंती नाकारली. हा कार्यक्रम प्रशासकीय असल्याचे भासविले जात असले तरी या कार्यक्रमामागे काँग्रेस पक्षाची भूमिका श्रेयवादाची होती. विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून केवळ श्रेयवादासाठीच आम्हाला जाणीवपूर्वक डावलून हा कार्यक्रम घेतला आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार घालावा लागल्याचे राष्ट्रवादी व भाजप युतीच्या नेते व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या उदघाटनाच्या कार्यक्रमावरून गावात चांगलेच राजकीय वादळ उठले आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुसऱ्यांदा पुन्हा उदघाटनाचा कार्यक्रम घेण्याच्या हालचाली राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहेत. (वार्ताहर)
रंगले मानापमान नाट्य...
आरोग्य केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात फारसे महत्त्व न दिल्यामुळे काँग्रेसचे पंचायत समितीचे सदस्य व माजी सभापती आबासाहेब चव्हाण हेही नाराज झाले आहेत. त्यांनी या नाराजीतून ग्रामपंचायत परिसरात पाच लाख रुपये खर्च करुन बसविण्यात येणाऱ्या पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे उदघाटन ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादी व भाजपच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन केले. या प्रकाराने खंडेराजुरीच्या काँग्रेस गटात चांगलेच मानापमानाचे नाट्य रंगले आहे.