खंडेराजुरीच्या जवानाचा जम्मूमध्ये मृत्यू
By Admin | Updated: June 4, 2014 00:02 IST2014-06-04T00:01:19+5:302014-06-04T00:02:46+5:30
बंदुकीची गोळी लागली

खंडेराजुरीच्या जवानाचा जम्मूमध्ये मृत्यू
मालगाव : खंडेराजुरी (ता. मिरज) येथील जवान महादेव बाजीराव पाटील (वय २४) जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत असताना दि. २ जूनरोजी बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. त्यांच्यावर उद्या (दि. ४ रोजी) खंडेराजुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पाटील यांच्या मृत्यूची बातमी समजताच पाटील कुटुंबियांसह खंडेराजुरीवर शोककळा पसरली. महादेव पाटील यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, तर बारावीपर्यंतचे शिक्षण मिरज महाविद्यालयात झाले. सैन्यदलात असलेल्या वडिलांचा आदर्श घेऊन ते पुणे येथे २००८ मध्ये मुंबई इंजिनिअरिंग बटालियनमध्ये भरती झाले होते. सध्या ते जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. दि. २ जूनरोजी सायंकाळी सातच्या दरम्यान सैन्यदलाच्या अधिकार्यांचा पाटील यांच्या घरी दूरध्वनी आला. पाटील बंदुकीची गोळी लागून जखमी झाल्याचे सांगण्यात आले, तर रात्री नऊ वाजता ते शहीद झाल्याचे कळविण्यात आले. गोळी कशी लागली याबाबतचा अधिक तपशील मिळू शकला नाही. घटनेचे वृत्त समजताच पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. (वार्ताहर)