खानापूर, आटपाडीत पेटणार ‘टेंभू’चे पाणी

By Admin | Updated: October 22, 2015 00:52 IST2015-10-22T00:28:59+5:302015-10-22T00:52:16+5:30

राजकीय वातावरण गढूळ : संघर्ष सोडून सामूहिक प्रयत्नांची गरज

Khanapure, 'water of water' | खानापूर, आटपाडीत पेटणार ‘टेंभू’चे पाणी

खानापूर, आटपाडीत पेटणार ‘टेंभू’चे पाणी

दिलीप मोहिते -- विटा -खानापूर मतदार संघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या ‘टेंभू दिवास्वप्न’च्या वक्तव्यावरून आमदार अनिल बाबर यांनी सदाभाऊंना हैराण केले होते. परंतु, आता आ. बाबर यांच्या एका विधानाचा धागा पकडून सदाभाऊंचे पुत्र व विट्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आ. बाबर यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच दुसरीकडे टेंभू योजना कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी नियोजनातील त्रुटींचा झेंडा खांद्यावर घेऊन तालुका ढवळून काढला आहे. त्यामुळे आता ‘टेंभू’चे पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय पटलावर ‘टेंभू’चे पाणी गढूळ झाल्याने कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेत राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. खानापूर विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक निवडणुका ‘टेंभू’च्या मुद्द्यावर गाजल्या व गाजविल्या गेल्या. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी व स्टार प्रचारकांनी ‘टेंभू’चे पाणी अक्षरश: दुष्काळग्रस्तांच्या बांधावर पोहोचविलेही; मात्र ते कृत्रिमरित्याच! त्यामुळे बांधापर्यंत आलेले पाणी आता शेतात येणार, या आशेने दुष्काळग्रस्त मतदारांनी खानापूर-आटपाडी तालुक्यातील प्रतिनिधीत्व मुंबईत पाठविले. परंतु, तेथे ‘टेंभू’च्या पूर्णत्वासाठी काय प्रयत्न झाले, हा खरा प्रश्न आजही दुष्काळग्रस्तांना नेहमीच सतावत आहे.
गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी टेंभू म्हणजे दिवास्वप्न असल्याच्या तत्कालीन आमदार सदाशिवराव पाटील यांच्या वक्तव्याने संपूर्ण मतदार संघात खळबळ उडाली. त्याचे राजकीय भांडवल विरोधकांनी मोठ्या प्रमाणात केले. त्यामुळे आपल्याला काय म्हणायचे होते, हे सांगण्यासाठी पाटील यांची दमछाक झाली. आता विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी खानापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात ‘टेंभू’च्या पाण्यात तालुक्याला बुडवून काढण्याची सुपारी घेतली नसल्याचे विधान केले. त्यामुळे आ. बाबर यांच्यावर माजी आमदार पाटील यांचे पुत्र नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी निशाणा साधत टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे या प्रकरणात विद्यमान आमदारांचीही धावपळ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खानापूर तालुका टेंभू योजना कृती समितीची स्थापना करून जलसंधारण समितीचे स्वीकृत सदस्य अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी आता योजनेतील त्रुटी व नियोजनाच्या अभावाचा झेंडा खांद्यावर घेऊन रान उठविले आहे.
राजकीय भांडवल बाजूला ठेवून सर्वच नेत्यांनी ‘टेंभू’च्या पूर्णत्वासाठी व दुष्काळग्रस्तांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.


राजकीय संघर्ष : आरोप-प्रत्यारोपाने करमणूक
‘टेंभू’च्या योजनेवरून होत असलेल्या वार-पलटवारांमुळे दुष्काळग्रस्तांची करमणूक होत आहे. त्यामुळेच आता खानापूर व आटपाडी या दुष्काळी तालुक्यांत टेंभू योजनेचे पाणी पोहोचण्यापूर्वीच राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय संघर्ष, श्रेयवाद अथवा योजनेचे राजकीय भांडवल बाजूला ठेवून सर्वच नेत्यांनी ‘टेंभू’च्या पूर्णत्वासाठी व दुष्काळग्रस्तांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याची अपेक्षा दुष्काळग्रस्त व्यक्त करीत आहेत. या योजनेवरुन पुढील राजकारण काय दिशा घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

बाबासाहेब मुळीक यांनी रान उठविले
खानापूर तालुका टेंभू योजना कृती समितीची स्थापना करून जलसंधारण समितीचे स्वीकृत सदस्य अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी आता योजनेतील त्रुटी व नियोजनाच्या अभावाचा झेंडा खांद्यावर घेऊन रान उठविले आहे. याची आता दुष्काळी भागात चर्चा सुरु झाली आहे.

Web Title: Khanapure, 'water of water'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.