खानापूर बाजाराकडे धान्य व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ
By Admin | Updated: November 23, 2014 23:46 IST2014-11-23T21:46:51+5:302014-11-23T23:46:07+5:30
शेतकऱ्यांचे हाल : खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याची मागणी

खानापूर बाजाराकडे धान्य व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ
पांडुरंग डोंगरे - खानापूर --खानापूर आठवडा बाजारात शेतकऱ्यांचा शेतीमाल हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी घेत आहेत. त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब किसान सभेचे भाई अरुण माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून धान्य व्यापाऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवून शेतमालाची खरेदी-विक्री बंद केल्याने शेतकऱ्यांनी शेतीमाल कोणाकडे विकायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. त्यामुळे शासनाने यात लक्ष घालून खानापूर येथे खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
खानापूर आठवडा बाजारात शेतीमाल हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करीत आहेत. हे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यात शेतकऱ्यांची पिळवणूक व फसवणूक होत आहे. किसान सभेचे अध्यक्ष अरुण माने यांनी प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा पुरवठा अधिकारी गलांडे व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. एस. एन. जाधव यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
यानंतर तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस दिल्याने दोन आठवड्यांपासून धान्य व्यापाऱ्यांनी खानापूर आठवडा बाजारात शेतीमाल खरेदी करणे थांबविले आहे. दोन आठवड्यापासून शेतीमाल विक्रीविना पडून राहिला आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली असली तरी अडचणी व गैरसोय निर्माण झाली आहे. खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व खानापूर येथे बाजार समितीचे धान्य खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
वास्तविक शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी व शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात बाजार समिती अस्तित्वात आहे. परंतु, शेतमाल खरेदीचे २५ टक्के व्यवहार बाजार समिती, तर ७५ टक्के व्यवहार खासगी व्यापारी करीत आहेत. यात शेतकऱ्यांचा मोठा तोटा होत आहे. खासगी व्यापाऱ्यांना बाजार समितीव्दारेच शेतीमाल खरेदी-विक्री परवाने दिले जातात. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)