‘आघाव’मुळे जतमध्ये ‘खाकी’ला कलंक

By Admin | Updated: November 12, 2014 23:28 IST2014-11-12T22:15:02+5:302014-11-12T23:28:28+5:30

पोलिसांची प्रतिमा सुधारा : गैर कारभार रोखण्याची गरज

'Khaki' stigma in 'Junk' | ‘आघाव’मुळे जतमध्ये ‘खाकी’ला कलंक

‘आघाव’मुळे जतमध्ये ‘खाकी’ला कलंक

जयवंत आदाटे : जत पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा आघाव यांना चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यामुळे जत पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली आहे. पोलीस स्टेशनचा कारभार पारदर्शक करण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आहे.
धोंडिराम महाजन रा. बिरूळ, (ता. जत) व त्यांच्या भावकीतील इतरांसोबत शेतजमीन वादातून तीन महिन्यांपूर्वी मारामारी झाली होती. यासंदर्भात परस्परविरोधी फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात उपनिरीक्षक सीमा आघाव यांना लाच घेताना रंगेहात पकडले होते. सीमा आघाव यांना निलंबित करून त्यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे. आघाव यांचा कार्यकाल प्रशिक्षणार्थी होता, तो नुकताच पूर्ण झाला होता. परंतु त्यांची सेवा कायम करण्यात आली नव्हती. त्यांच्या कामकाजाबद्दल येथील नागरिकांच्या तक्रारी होत्या; परंतु त्या एक महिला असून प्रशिक्षणार्थी असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत होते.
आघाव यांच्यावर निलंबनाची कारवाई करत असताना पोलीस निरीक्षक प्रकाश कदम यांची येथून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. येथील अतिरिक्त कार्यभार सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एच. शेख यांच्याकडे देण्यात आला आहे. जत पोलीस ठाण्यात नागरिकांचे काम मोफत होत नाही. देवाण-घेवाण ठरल्यानंतर कामाची पूर्तता केली जात आहे. येथे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी काही दलाल नेमले आहेत. त्यांच्यामार्फत सर्व व्यवहार पूर्ण केले जात आहेत. यामध्ये काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सीमा आघाव यांना निलंबित करून व प्रकाश कदम यांची बदली करून पोलीस स्टेशनची प्रतिमा स्वच्छ होणार नाही. यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक केली तरच पोलीस ठाण्यातील भ्रष्ट कारभार थांबणार आहे.

कार्यालयाबाहेर टक्केवारीचा बाजार
वरिष्ठांना बसण्यासाठी जत पोलीस स्टेशनची इमारत अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे बाहेर फिरून आर्थिक गणित जमविण्याचा प्रयत्न ते करू लागले आहेत.
जत पोलीस स्टेशनकडे अधिकारी व कर्मचारी मिळून ७६ जागा मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात ५१ जण कार्यरत असून, त्यांच्याकडे पश्चिम भागातील ७५ गावांचा कार्यभार देण्यात आला आहे, तर उमदी पोलीस स्टेशनकडे उर्वरित ५० गावांचा कार्यभार देण्यात आला आहे.

Web Title: 'Khaki' stigma in 'Junk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.