येळापूर गणावर पदांची खैरात
By Admin | Updated: November 28, 2015 00:16 IST2015-11-27T23:44:27+5:302015-11-28T00:16:28+5:30
तीनही गटांची मर्जी : गण आपल्याकडे ठेवण्यासाठी नेत्यांत स्पर्धा

येळापूर गणावर पदांची खैरात
शिवाजी पाटील - येळापूर पंचायत समिती गणावर शिराळा तालुक्यातील तीनही गटांनी पदांची खैरात केली आहे. सर्वजण हा गण आपल्याकडे ठेवण्यासाठी कामाला लागले असून या गणातील जनता आगामी काळात कुणाच्या झोळीत दान टाकणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.येळापूर पंचायत समिती गण हा कोकरुड जिल्हा परिषद गटातील महत्त्वाचा गण आहे. या अनुषंगाने भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने तब्बल १९ पदांची खैरात केली आहे. भाजप व राष्ट्रवादीने सर्वात जास्त पदे दिली आहेत. भाजपकडून मारुती कुंभार (ग्लुकोज), सौ. सुभद्रा आटुगडे (दूध संघ), दगडू सावंत (समन्वय समिती), नामदेव पाटील, कुमार कडोले, सुरेश पाटील (वारणा-मोरणा), बाबूराव शिंदे, सौ. रेखा एटम (दक्षता समिती), राष्ट्रवादीकडून तानाजी वनारे (विश्वास साखर), दिनकर दिंडे (बाजार समिती), प्रकाश धस, पी. डी. पाटील, शिवाजी लाड, सौ. अनिता चिंचोलकर (सर्व दूध संघ), शामराव सावंत (अर्बन बँक).काँग्रेसकडून मनोज चिंचोलकर, राजाराम जाधव (निनाई कारखाना), प्रल्हाद जाधव (खरेदी-विक्री), श्रीमती कविता पाटील (बाजार समिती) या नेत्यांच्या निवडी करुन काम करण्याची संधी दिली आहे. त्याचबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून पक्षीय पातळीवर काही निवडी करुन कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.या सर्व पदांच्या वाटपामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर नूतन पदाधिकाऱ्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे येळापूर गणातील कोणता पक्ष गणातील मतदारांना आपल्याकडे खेचणार, हे औत्सुक्याचे ठरणार आहे. पक्षाकडून अनेकांना संधी मिळाल्याने समाधान आहे.