रॉकेल, धान्य कोट्यासाठी शिराळ्यात मोचा
By Admin | Updated: February 4, 2015 00:03 IST2015-02-03T23:20:53+5:302015-02-04T00:03:32+5:30
प्रांताधिकाऱ्यांना निवेदन : केशरी शिधापत्रिका धारकांच्या मागण्या पूर्ण कर्रा

रॉकेल, धान्य कोट्यासाठी शिराळ्यात मोचा
शिराळा : केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य कोटा त्वरित सुरू करावा व रॉकेल कोटा पूर्ववत सुरू करण्याची मागणी घेऊन तालुका राष्ट्रवादी, युवक राष्ट्रवादी व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तिन्ही संघटनांचे अनुक्रमे विजयराव नलवडे, सम्राटसिंंह नाईक व सागर नलवडे यांनी याचे नेतृत्व केले. माजी आमदार मानसिंंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा बसस्थानकापासून मोर्चाची सुरुवात झाली. तिन्ही संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा मोर्च्यात सहभाग होता. तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे म्हणाले की, केशरी शिधापत्रिका धारकांना आघाडी शासनाच्या काळात धान्य पुरवठा केला जात होता. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रति किलो २ रुपये दराने गहू व ३ रुपयांनी तांदूळ दिला जात होता. राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या भाजप, शिवसेना सरकारने या महत्त्वाकांक्षी योजना बंद केल्या आहेत. खेडेगावात स्वयंपाकासाठी चूल व स्टोव्हचा वापर केला जातो. भारनियमनामुळे कंदील, दिवे लावावे लागतात. नवीन सरकारने रॉकेलचा कोटा कमी केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पूर्वीप्रमाणेच रॉकेलचा कोटा द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी विजयसिंंह देशमुख व तहसीलदार विजया जाधव यांना देण्यात आले. निवेदनातील मागण्या शासनापर्यंत कळविल्या जातील, असे आश्वासन प्रांताधिकारी व तहसीलदारांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी ‘विश्वास’चे संचालक भीमराव गायकवाड, विश्वास कदम, माजी सभापती अॅड. भगतसिंंग नाईक, संचालक रणजितसिंंह नाईक, अभिजित नाईक, विराज नाईक, विश्वप्रताप नाईक, पंचायत समिती सदस्य लालासाहेब तांबीट, सरपंच गजानन सोनटे, उपसरपंच संभाजी गायकवाड, माजी सरपंच देवेंद्र पाटील, दिलीप घाटगे, ग्रामपंचायत सदस्य एम. आर. कुरणे, दस्तगीर आत्तार, संजय हिरवडेकर, बाबा कदम, सुनील कवठेकर, अशोक यादव, संतोष पांगे, मंगेश कांबळे, बसवेश्वर शेटे उपस्थित होते. (वार्ताहर)