पाणी योजनांची कामे रखडणार

By Admin | Updated: June 17, 2016 23:24 IST2016-06-17T23:17:33+5:302016-06-17T23:24:04+5:30

विदर्भाकडे स्थलांतर : ‘कृष्णा-कोयना’नंतर ‘ताकारी-म्हैसाळ’ची कार्यालये गुंडाळण्यात येणार

Keep the works of water schemes | पाणी योजनांची कामे रखडणार

पाणी योजनांची कामे रखडणार

मिरज : कृष्णा खोरे विकास महामंडाळांतर्गत कृष्णा-कोयना उपसा सिंचन बांधकाम विभागाचे कार्यालय विदर्भात स्थलांतरित केल्यानंतर ‘ताकारी व म्हैसाळ’ची दोन मंडल कार्यालये विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे स्थलांतरित होणार आहेत. यामुळे अपूर्ण असलेल्या ताकारी म्हैसाळ सिंचन योजनांना फटका बसणार असून कालवे व पोटकालव्यांची कामे रखडण्याची चिन्हे आहेत. विदर्भातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्यातील ३० मंडल कार्यालये बंद करण्यात येणार असून कृष्णा खोरे प्रकल्पाच्या ताकारी, म्हैसाळ योजनेची प्रत्येकी दोन मंडल कार्यालये असून, त्यापैकी बांधकाम कार्य प्रकारातील दोन मंडल कार्यालये बंद करून ती विदर्भात हलविण्याचा प्रस्ताव आहे. कृष्णा खोरे महामंडळांतर्गत टेंभू, ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांची कामे अपूर्ण असताना, येथील बांधकाम कार्यालये विदर्भात हलवून केवळ सिंचन व्यवस्थापन कार्यालये अस्तित्वात राहणार असल्याने सिंचन योजनांची अपूर्ण कामे थांबणार आहेत. जलसंपदा विभागाच्या निर्णयानुसार विदर्भात सिंचन व्यवस्थापनाची स्वतंत्र व सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयांची फेररचना करण्यात येत आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळअंतर्गत दोन नवीन सिंचन व्यवस्थापन मंडळांच्या निर्मितीसाठी कृष्णा खोरे प्रकल्पाची बांधकाम कार्यालये गुंडाळण्यात येत आहेत. ताकारी, म्हैसाळ योजनेचे कालवे व पोटकालवे अपूर्ण असल्याने लाभक्षेत्रात पाणी पोहोचत नाही. परिणामी पाणीपट्टी वसुली होत नसल्याने या योजना अगोदरच अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत कृष्णा खोरे प्रकल्पाची बांधकाम कार्यालये बंद करण्यात येत असल्याने अपूर्ण कामे वर्षानुवर्षे रखडणार आहेत. कृष्णा-कोयना उपसा सिंचन मंडळ हे बांधकाम कार्य प्रकारातील मंडळ कार्यालय यवतमाळकडे वर्ग करून या कार्यालयाची आस्थापना सांगली पाटबंधारे मंडळाच्या नियंत्रणाखाली आणल्यामुळे, कृष्णा खोरे प्रकल्पाच्या सिंचन योजनांच्या व्यवस्थापनासाठी पाटबंधारे मंडळावर ताण पडणार आहे. पाटबंधारे विभागाकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असताना, बंद करण्यात येणाऱ्या कार्यालयांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या सिंचन व्यवस्थापनाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

बाराशे कोटींची कामे अद्याप अपूर्ण
म्हैसाळ योजनेसाठी गेल्या १८ वर्षात सुमारे दोन हजार कोटी रूपये खर्च झाले असून अद्याप बाराशे कोटी रूपयांची कामे अपूर्ण आहेत. ताकारीसाठी सुमारे एक हजार कोटी खर्च झाले असून अद्याप चारशे कोटी रूपयांची कामे अपूर्ण आहेत. कालवे व पोटकालवे, कालव्यांचे अस्तरीकरण ही बांधकाम विभागाकडील कामे अपूर्ण असल्याने ताकारी म्हैसाळच्या लाभक्षेत्रापैकी केवळ ३० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

Web Title: Keep the works of water schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.