जत मतदारसंघ काँग्रेसकडेच ठेवा
By Admin | Updated: July 19, 2014 00:12 IST2014-07-19T00:10:40+5:302014-07-19T00:12:49+5:30
उमाजी सनमडीकर, पी. एम. पाटील : पक्षश्रेष्ठींकडे केली मागणी

जत मतदारसंघ काँग्रेसकडेच ठेवा
जत : जत विधानसभा मतदारसंघातून सलग ३८ वर्षे कॉँग्रेसचे आमदार निवडून गेले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ कॉँग्रेसकडे रहावा, अशी मागणी पक्षाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार उमाजी सनमडीकर, तालुकाध्यक्ष पी. एम. पाटील व उपाध्यक्ष विक्रम सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत मतदारसंघाचे प्रतिनिधी व प्रदेश समन्वयक डॉ. अंबालाल पाटील यांनी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहिती घेतली आहे. त्यांचा अहवाल ते वरिष्ठांना सादर करणार आहेत. जत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे का कॉँग्रेसकडे असावा, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक उमेदवार असावा अशी मागणी आम्ही पक्षाकडे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांना प्रत्यक्ष भेटून केली
आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील ४९ गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी मिळत नसल्यामुळे त्यांना कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी द्यावे, त्यासंदर्भात राज्य शासन कर्नाटक सरकारशी चर्चा करणार आहे. या योजनेचा प्राथमिक अहवाल शासनाला प्राप्त झाल आहे. त्याला अनुसरून प्रयत्न केले जातील आणि जत तालुक्याचे विभाजन करणारा प्रश्न प्रलंबित आहे. जर विभाजन करता आले नाही, तर पूर्व भागात स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय सुरू करून तेथील जनतेची सोय केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जतचे विरोधी गटनेते परशुराम मोरे, माजी सभापती बाबासाहेब कोडग, सुनील चव्हाण, संतोेष भोसले, अॅड. बाळ निकम, संतोष कोळी, विनय बेळंखी उपस्थित होते. (वार्ताहर)