कवठेमहांकाळ तालुक्यात आबा-सगरे गटाची बाजी
By Admin | Updated: February 23, 2015 00:17 IST2015-02-22T23:11:24+5:302015-02-23T00:17:14+5:30
काका-सरकार गटाला धक्का : देशिंग, हिंगणगाव, तिसंगी, कुंडलापूर सोसायट्यांवर वर्चस्व

कवठेमहांकाळ तालुक्यात आबा-सगरे गटाची बाजी
कवठेमहांकाळ : देशिंग, हिंगणगाव, तिसंगी, कुंडलापूर या चार गावच्या झालेल्या विकास सोसायटींच्या निवडणुकीत आबा-सगरे गटाने एकतर्फी विजय मिळवित आबांना आदरांजली वाहिली, तर विरोधी काका-सरकार पॅनेलचा धुव्वा उडाला आहे.
तिसंगी, हिंगणगाव, कुंडलापूर, देशिंग या चार गावांच्या विकास सोसायटींच्या निवडणुका ऐन आबांच्या दु:खात पार पडल्या. घाटमाथ्यावरील कुंडलापूर सोसायटीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. येथे आर. आर. आबा पाटील विकास पॅनेल विरुद्ध काका-सरकार पॅनेल असा थेट सामना झाला. आर. आर. (आबा) पाटील विकास पॅनेलच्या मदतीला विजयराव सगरे यांची मोठी ताकद मिळाली. आबा-सगरे गटाच्या कार्यकत्यानी विरोधी पॅनेलचा सुपडासाफ केला. १३ च्या १३ जागांवर मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळविला. आबा-सगरे गटाच्या पॅनेलच्या उमेदवारांना प्रत्येकी २१० पैकी १२६ मते मिळाली, तर विरोधी काका-सरकार पॅनेलच्या उमेदवारांना प्रत्येकी अवघ्या ५३ मतांवर समाधान मानावे लागले.
आबा-सगरे गटाच्या पॅनेलचे नेतृत्व युवा नेते दीपक चव्हाण यांनी केले, तर त्यांना विजय चव्हाण, प्रल्हाद हाक्के, डॉ. माणिक पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व सरपंच पोपट गिड्डे, दिलीप पाटील, बबन माने यांनी केले.
तिसंगी विकास सोसायटीवरही आबा-सगरे गटाने राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. १३ पैकी १० जागा आबा-सगरे गटाने पटकावल्या, तर विरोधी काका-सरकार गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. विजयी सिद्धनाथ विकास पॅनेलचे नेतृत्व विठ्ठल कदम, तानाजी कदम, धनाजी पाटील, जगदीश पोळ, रघुनाथ जाधव यांनी केले, तर विरुद्ध पराभूत काका-सरकार पॅनेलची धुरा सुशांत पोळ, रमेश पोळ, बाळासाहेब पोळ, सुरेश पोळ यांनी वाहिली.
हिंगणगाव येथील विकास सोसायटीच्या निवडणुकीत आबा-सगरे गटाच्या महांकाली शेतकरी पॅनेल विरुद्ध काका-सरकार गटाचे परिवर्तन पॅनेल असा सामना झाला. यामध्ये १३ पैकी तब्बल ९ जागा आबा-सगरे गटाने जिंकल्या, तर अवघ्या चार जागा काका-सरकार गटाला मिळाल्या. आबा-सगरे गटाच्या पॅनेलचे नेतृत्व चंद्रकांत लोंढे, राजाराम सगरे, रावसाहेब पाटील, आदगोंडा पाटील यांनी केले, तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व दीपक लोंढे, शकुंतला पाटील, चंद्रकांत पाटील यांनी केले.
संपूर्ण तालुक्याचे लक्ष देशिंग येथील विकास सोसायटीच्या निवडणुकीकडे लागले होते. कारण येथे अजितराव घोरपडे यांचे कट्टर विरोधक, बाजार समितीचे माजी उपसभापती भारत डुबुले यांचा पाडाव करण्यासाठी घोरपडे यांनी कंबर कसली होती; परंतु यामध्ये भारत डुबुले वरचढ ठरले.
येथील निवडणुकीत १३ पैकी तब्बल १२ जागा आबा-सगरे गटाच्या महालक्ष्मी शेतकरी पॅनेलने जिंकल्या, तर काका-सरकार गटाच्या अंबिका महांकाली पॅनेलला केवळ १ जागा मिळाली. विशेष म्हणजे जिल्हा बॅँकेचे माजी संचालक जयराजबाबा घोरपडे यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. विजयी आबा-सगरे गटाच्या पॅनेलचे नेतृत्व भारत डुबुले, विलासराव कोळेकर, आप्पासाहेब कोळेकर, विष्णू जगताप यांनी केले, तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व जयराज घोरपडे, संभाजी पवार यांनी केले. (वार्ताहर)
विजय आबांना अर्पण
या चारही विकास सोसायटी आबा-सगरे गटाने जिंकल्या, परंतु दु:खात असणाऱ्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला नाही, फटाके उडविले नाहीत. उलट स्तब्ध राहून आबांना विजय समर्पित करीत श्रद्धांजली वाहिली व कार्यकर्ते घरी निघून गेले.
.. तरीही पराभव
देशिंगच्या विकास सोसायटीच्या निवडणुकीदिवशी अजितराव घोरपडे यांनी मतदान केंद्रावर चार तास तळ ठोकूनही त्यांच्या गटाला मोठा पराभव स्वीकारावा लागला.