कवलापूरकरांना चोरट्यांनी पळविले!

By Admin | Updated: August 6, 2015 22:46 IST2015-08-06T22:46:52+5:302015-08-06T22:46:52+5:30

घरावर दगडफेक : गावकऱ्यांकडून रात्रभर शोध; भीतीचे वातावरण

Kawalapurkar was abducted by thieves! | कवलापूरकरांना चोरट्यांनी पळविले!

कवलापूरकरांना चोरट्यांनी पळविले!

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे बुधवारी रात्री गावात शिरलेल्या तीन चोरट्यांनी घरावर दगडफेक केली. घराची कौले व पत्रा उचकटून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने गस्त घालणाऱ्या तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केला; पण गल्ली-बोळ व अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. रात्री साडेबारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत तरुणांनी गस्त घालत या चोरट्यांचा शोध सुरू ठेवला होता.वाळवा आणि शिराळा तालुक्यात चोरट्यांनी महिन्यापूर्वी धुमाकूळ घातल्याने तिथे गावकऱ्यांची गस्त सुरू झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावरून मध्यप्रदेश आणि गडचिरोली येथून तीन हजार गुन्हेगारांनी सांगली जिल्ह्यात चोरी करण्यासाठी शिरकाव केला असल्याची पोस्ट पडली. त्यामुळे भीतीने जिल्ह्यातील अनेक गावात गस्त सुरू झाली आहे. चार दिवसांपूर्वी नांद्रे (ता. मिरज) येथे घरावर दगडफेक करणारा गस्त पथकातील तरुणच निघाला होता. इस्लामपुरात गस्त घालणारेच चोरटे निघाले होते. याशिवाय सांगलीत गस्तीच्या नावाखाली दहशत व हुल्लडबाजी करणाऱ्या ११ तरुणांना अटक केली होती. चोर आल्याची निव्वळ अफवा असल्याने जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी प्रसारमाध्यमांपुढे जाहीर केले आहे. तरीही गस्त बंद झालेली नाही. गस्तीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कवलापुरात बुधवारी रात्री तरुणांची फौज हातात काठ्या घेऊन नेहमीप्रमाणे गस्त घालत होती. तानाजी चौकातील एका घराची कौले व पत्रा उचकटून चोरटे घरात प्रवेश करीत असल्याने काही तरुणांनी पाहिले. त्याने चोर, चोर म्हणून आरडाओरड केली. त्याच्या आवाजाने अन्य भागात गस्त घालणारे तरुण तानाजी चौकात जमा झाले. चोरट्यांचा शोध सुरू ठेवला. तोपर्यंत चावडीजवळ एका घरावर दगडफेक झाली. तानाजी चौकातील तरुणांची फौज चावडीजवळ जमा झाली. त्यानंतर धनगर गल्ली व विठ्ठल मंदिर परिसरातील घरावर दगडफेक झाली. चोरटे याठिकाणी अंधारात लपून बसले असल्याची माहिती मिळताच तरुणांनी शोध सुरू ठेवला. काही तरुणांना तीन चोरट्यांचे दर्शन झाले. मात्र गल्ली-बोळ व अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. तरीही सकाळी सहापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. (प्रतिनिधी)

तोंडाला रूमाल
चोरटे तीन होते. त्यांच्या तोंडाला रूमाल होता. अंगात काळा टी-शर्ट व हाफ पॅन्ट होती, असे प्रत्यक्षात चोरट्यांना पाहणाऱ्या तरुणांनी सांगितले. गुरुवारी रात्रीपासून गस्त मोहीम जोरदार राबविणार असल्याचे तरुणांनी सांगितले.

Web Title: Kawalapurkar was abducted by thieves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.