कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी खिळखिळी
By Admin | Updated: August 14, 2015 00:01 IST2015-08-13T23:32:51+5:302015-08-14T00:01:45+5:30
बाजार समिती निवडणूक : संजयकाका पाटील गटाशी युती; तासगावातील गदारोळाचा फटका--कवठेमहांकाळचे कुरुक्षेत्र

कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी खिळखिळी
अर्जुन कर्पे -कवठेमहांकाळ बाजार समितीच्या निवडणुकीतील पराभवाने दुष्काळी पट्ट्यातील राष्ट्रवादी पुरती खिळखिळी झाली असून, आर. आर. पाटील (आबा) यांनी बांधलेली राष्ट्रवादी पक्षाची मोट पक्षातीलच प्रमुख नेत्यांनी व पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी मोडण्याचा प्रयत्न केला आहे. आ. जयंत पाटील यांचे दुर्लक्ष, विजय सगरे, सुरेशभाऊ पाटील यांचा बेजबाबदारपणा आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील गटाशी केलेली युती व तासगावातील ‘दंगा’ बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवास कारणीभूत ठरला आहे. हा पराभव गांभीर्याने न घेतल्यास व आत्मचिंतन न केल्यास, तालुक्यातून राष्ट्रवादी पक्ष हद्दपार होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
सांगली बाजार समितीची निवडणूक ही खऱ्याअर्थाने भविष्यातील जिल्ह्याचे राजकारण बदलणारी ठरली आहे. परंतु याची बीजे दुष्काळी पट्ट्यातील मिरज, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यात पेरली गेली आहेत.
बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आणि तालुक्यात राष्ट्रवादीला फंदफितुरीने, नाराजीने, उमेदवारी निश्चितीच्या प्रश्नांनी चक्रव्यूहात अडकविले. राष्ट्रवादीचे राज्यस्तरावरचे नेते जयंत पाटील हा चक्रव्यूह भेदतील व यशस्वी खेळी करतील, असे सर्वांनाच वाटत होते. परंतु या दुष्काळी पट्ट्यात ‘रेडिमेड’ कार्यकर्त्यांनी व प्रमुख नेत्यांनी जयंत पाटील यांच्यापर्यंत राजकीय वस्तुस्थिती कथन करून उपाययोजना करण्यापेक्षा, अति आत्मविश्वासाने आपलेच पॅनेल विजयी होणार, असे छातीठोकपणे सांगितले होते. साहजिकच नेहमी गांभीर्याने राजकारण करणाऱ्या जयंत पाटील यांनी या निवडणुकीत ढिले धोरण स्वीकारले. येथेच राष्ट्रवादीचा घात झाला व त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.
जयंत पाटील यांच्यानंतर तालुक्यात निवडणुकीची जबाबदारी होती, ती राष्ट्रवादीचे नेते विजय सगरे, सुरेशभाऊ पाटील व चंद्रकांत हाक्के यांच्यावर. या त्रिमूर्तीने मोठ्या जोशात निवडणूक हाती घेणे गरजेचे होते. परंतु संपूर्ण निवडणुकीच्या काळात व निवडणुकीपूर्वीही या नेत्यांमधील बेजबाबदारपणा व दुर्लक्ष स्पष्ट जाणवत होते. बाजार समितीच्या उमेदवारी निश्चितीवरुन राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य घडले. परंतु त्याबाबत तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी गांभीर्याने घेतले नाही. पॅनेलप्रमुख जयंत पाटील यांच्यापर्यंत नाराजीनाट्य नेऊन ते थांबविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले नाहीत. याचाही फटका राष्ट्रवादीला बसला.
परंतु जयंत पाटील यांच्यानंतर विजय सगरे, सुरेश पाटील या प्रमुख नेत्यांनी नाराजांशी चर्चा करून कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन लढाईत उतरणे आवश्यक होते. परंतु हे दोन्ही नेते उच्च पातळीवरील व आदेशाचे राजकारण करीत राहिले. या वेळेत अजितराव घोरपडेंच्या तात्यासाहेब नलवडे, तानाजी पाटील या सरदारांनी राजवर्धन घोरपडेंना सोबत घेऊन राष्ट्रवादीचे पॉकेट असणाऱ्या गावांतून फोडाफोडी केली व बेरजेचे राजकारण केले. हे राष्ट्रवादीच्या लक्षात यायला पराभवाचा दिवस उजाडायला लागला. त्यावेळी राष्ट्रवादीकडे पश्चातापाशिवाय काहीच उरले नव्हते.
विजय सगरे यांनी महांकाली कारखान्याच्या निवडणुकीसारखी मशागत या निवडणुकीत केली असती, सुरेश पाटील यांनीही विधानसभेसारखी फिल्डिंग लावली असती आणि जयंत पाटील यांनी या मशागतीची उजळणी केली असती, तर राष्ट्रवादीला पराभवाचा फटका बसला नसता.
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ
आबा-काका गटात झालेला गदारोळ तालुक्यात चांगलाच महागात पडला. दुखावलेल्या निष्ठावान आबाप्रेमींनी जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील यांच्या युतीला रेड सिग्नल देत विरोधात कौल दिला. त्याचा मोठा फटका पक्षाला सहन करावा लागला. ही निवडणूक राष्ट्रवादीला चांगलाच धडा शिकविणारी, तर अजितराव घोरपडे गटाला उर्जितावस्था आणि काँग्रेसला बळ देणारी ठरली. जयंत पाटील यांच्यासारख्या कुशल व राजकारणात पारंगत असणाऱ्या नेत्याला हार पत्करावी लागली. वरिष्ठ नेतृत्वापासून तालुकास्तरापर्यंतच्या नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने न घेतल्याने, तसेच अतिआत्मविश्वासाने, जबाबदारी झटकल्याने निवडणूक हातातून घालविली. याचा मोठा फटका कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीला बसला असून पक्ष खिळखिळा झाला आहे. या पराभवानंतरही नेत्यांनी गांभीर्याने घेतले नाही, तर तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष औषधाला तरी उरणार का?, असा सवाल तालुक्यातील राष्ट्रवादीप्रेमी करू लागले आहेत.
हाक्केंच्या ‘शिवराळ गप्पा’ महागात पडल्या
ढालगावच्या चंद्रकांत हाक्के यांनी जयंत पाटील यांच्या मनधरणी व आदेशानंतर फिल्डिंग लावली व प्रयत्नही केले. परंतु हाक्के यांच्या चारचौघांच्या बैठकीतील ‘शिवराळ गप्पा’ चांगल्याच महागात पडल्या. या गप्पांमुळे थेट मतदारांच्या मनावर जखमा झाल्या व हे जखमी कार्यकर्ते ‘ओठात एक व पोटात एक’ या उक्तीप्रमाणे वागले.