कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादीला खिंडार
By Admin | Updated: July 26, 2015 00:17 IST2015-07-26T00:07:19+5:302015-07-26T00:17:09+5:30
अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामा : आबांच्यानंतर कार्यकर्त्यांना वाली राहिला नसल्याची खंत

कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादीला खिंडार
कवठेमहांकाळ : बाजार समितीच्या निवडणुकीतील पक्षांतर्गत राजकारणामुळे राष्ट्रवादीचे कवठेमहांकाळ तालुकाअध्यक्ष भानुदास पाटील व उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे.
दोन्ही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. भानुदास पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत खळबळ माजली आहे.
शनिवारी कवठेमहांकाळ येथे भानुदास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिल्याचे सांगितले. यावेळी भानुदास पाटील यांनी पक्ष नेतृत्वावर तसेच निर्णय प्रक्रिया राबविणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, आपण पक्षाचे तालुकाअध्यक्ष असताना कोणत्याही राजकीय निर्णय प्रक्रियेत आपल्याला समावून घेतले जात नाही. तालुक्यात आर. आर. आबांच्या निधनानंतर निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय सुरू आहे. तालुक्यात गटबाजीचे जोरदार राजकारण सुरू असून, महांकालीचे अध्यक्ष विजयराव सगरे व सुुरेश पाटील यांच्या गटबाजीच्या राजकारणाचा आपल्याला कंटाळा आला आहे. अशा गटबाजीच्या राजकारणात अडकण्यापेक्षा घरी बसलेले बरे म्हणून आपण हा राजीनामा देत आहोत.
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीतही उमेदवारी निश्चित करीत असताना गटबाजीचे व जिरवा-जिरवीचे राजकारण झाले. त्यावेळीही आपल्याला किंमत दिली नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सांगली बाजार समितीच्या उमेदवारी निश्चितीवेळीही आपल्याला निर्णय प्रक्रियेत व विश्वासात घेतले नाही. मग हा पक्ष व पद काय कामाचे. ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे. आपला व राष्ट्रवादी पक्षाचा भविष्यात काडीचा संबंध राहणार नसल्याचे भानुदास पाटील यांनी सांगितले. यावेळी महादेव सूर्यवंशी, नंदकुमार घाडगे, मधुकर पाटील यांच्यासह ग्रामपंचायत, विकास सोसायटीचे निवडक सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)
जयंत पाटील यांचे दुर्लक्ष
पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे सोपविली आहे. परंतु जयंत पाटीलसुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असल्यानेच राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे पाटील म्हणाले. आर. आर. आबा पाटील स्थानिक कार्यकर्त्यांची मते लक्षात घेऊन कोणताही निर्णय घेत होते, परंतु आबांच्यानंतर खरंच आम्ही पोरके झालो आहोत. आता आधार तरी कुणाचा शोधायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गटबाजीवर टीकास्त्र
सुरेश पाटील व विजय सगरे यांच्यातील गटबाजीचे राजकारण आता कळीचा मुद्दा बनला आहे. याच गटबाजीचा धागा पकडत तालुका अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. एवढे सारे घडत असतानाही नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नेत्यांबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.