कवठेमहांकाळ तालुका अद्याप तहानलेलाच!
By Admin | Updated: November 11, 2014 23:17 IST2014-11-11T22:51:49+5:302014-11-11T23:17:35+5:30
हरितक्रांती कधी? : दहा तलाव, मध्यम प्रकल्प व बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतीला पाणी

कवठेमहांकाळ तालुका अद्याप तहानलेलाच!
एच. बी. तांबोळी -कुची -कवठेमहांकाळ तालुका पाण्याच्यादृष्टीने स्वयंपूर्ण व्हावा, जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली यावे, शेती व शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी तालुक्यात विविध योजना अस्तित्वात आहेत. दहा तलाव, मध्यम प्रकल्प व बंधाऱ्यांच्या माध्यमातूनही बरेचसे क्षेत्र ओलिताखाली आहे. असे असतानाही जवळपास निम्मा तालुका अद्याप तहानलेला आहे. तालुक्यात हरितक्रांती कधी येणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
म्हैसाळ योजनेचा तालुक्यातील २२ गावांना लाभ झाला. या योजनेमध्ये ओलिताखाली येणारे क्षेत्र १३८८२ हेक्टर इतके आहे. पोटकालव्यांची कामे पूर्ण होत आहेत. टेंभू योजनेतून तालुक्यातील ७८६० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. १८ गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. पण ही योजना अद्याप निधीअभावी अपूर्ण आहे. बनेवाडी उपसा सिंचन, आगळगाव व घाटनांद्रे उपसा सिंचन योजनाही अपूर्णच आहेत. अग्रणी नदीवर कोल्हापूर पद्धतीचे १२ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातून नऊ गावांतील सुमारे ४९२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याशिवाय तालुक्यातील दहा लघु पाटबंधारे तलाव व एका मध्यम प्रकल्पामुळे ३९३२ हेक्टर क्षेत्रास लाभ मिळतो आहे.
तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी म्हैसाळ, टेंभू योजना, आगळगाव, बनेवाडी, घाटनांद्रे उपसा सिंचन योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, तलाव अशा योजना असल्या तरी, ढालगावसह पूर्वभाग, घाटनांद्रेसह, घाटमाथा परिसर आदी भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. म्हैसाळ, टेंभू योजना पुरेसा निधी व आर्थिक बाबीमुळे संकटात आहेत. तसेच बंधारे, तलाव निसर्ग व पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहेत. तालुक्याचा दुष्काळी हा कलंक पुसण्यास प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा आहे.
योजनेचे ओलिताचे लाभार्थी
नावक्षेत्र (हे.)गावे
म्हैसाळ योजना१३८८२ २२
टेंभू योजना ७८६० १०+८
बनेवाडी सिंचन ११०००४
आगळगाव सिंचन५००००५
घाटनांद्रे सिंचन ३००००७
कोल्हापूर बंधारे४९२०९
लघु पाटबंधारे तलाव ३९३२१०+१