कवठेएकंदच्या वृद्धेच्या घराला दोन तासांत मिळालं छत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST2021-09-16T04:33:27+5:302021-09-16T04:33:27+5:30
ओळ : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे ग्रामपंचायत सदस्य कुलदीप शिरताेडे यांनी लक्ष्मी शिंदे यांच्या घराचे छत पुन्हा बसवून दिले. ...

कवठेएकंदच्या वृद्धेच्या घराला दोन तासांत मिळालं छत
ओळ : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे ग्रामपंचायत सदस्य कुलदीप शिरताेडे यांनी लक्ष्मी शिंदे यांच्या घराचे छत पुन्हा बसवून दिले.
लाेकमत न्युज नेटवर्क
कवठेएकंद : मुलाने कामावर घेतलेली उचल वेळेवर परत न केल्याने संबंधित व्यावसायिकाने कवठेएकंद (ता. तासगाव) येथील लक्ष्मी दिलीप शिंदे (परीट) (वय ६५) या वृद्धेच्या घरावरील छताचे पत्रे काढून नेले. या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य कुलदीप शिरतोडे, सचिन पाटील व सहकाऱ्यांनी अवघ्या दोन तासांत शिंदे यांच्या घरावर पुन्हात छत घालून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
कवठेएकंद (ता. तासगाव) येथील लक्ष्मी शिंदे यांच्या मुलाने कामावरून २० हजार रुपयांची उचल घेतली हाेती. ती वेळेवर फेडू न शकल्याने संबंधित व्यावसायिकाने त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला हाेता. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने बुधवारी त्याने लक्ष्मी शिंदे यांच्या घरात येऊन थेट त्याच्या घराच्या छतावरील पत्रेच काढून नेले. याची माहिती मिळताच ग्राम पंचायत सदस्य कुलदीप शिरतोडे व सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी तेथे भेट देऊन पाहणी केली. मदतीचा हात देत त्यांच्या छपरावरील पत्रे दोन तासांच्या आत पुन्हा बसवून दिले. त्यांना गणेश तपासे, सुशांत कांबळे, आदित्य कांबळे, प्रतीक कांबळे, विशाल पाटील, राहुल माळी, विजय थोरात, राजेंद्र नंदेश्वर, सुमित कांबळे, सुरज सुतार, लिग्गाप्पा बसर्गी यांनी सहकार्य केले.