कवठेमहांकाळ काँग्रेसचे कारभारी झाले सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:52+5:302021-03-30T04:17:52+5:30
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात काँग्रेसने राजकीय फोडाफोडीची धुळवड जोरात सुरू केली आहे. मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दादासाहेब ...

कवठेमहांकाळ काँग्रेसचे कारभारी झाले सक्रिय
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात काँग्रेसने राजकीय फोडाफोडीची धुळवड जोरात सुरू केली आहे. मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दादासाहेब ढेरे यांनी राष्ट्रवादीला अलविदा करत काँग्रेसचा हात धरला. त्यामुळे राष्ट्रवादीवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे; तर काँग्रेसचे तालुक्यातील कारभारी सक्रिय झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एकेकाळी या तालुक्यात काँग्रेस पक्ष हा प्रमुख पक्ष होता. परंतु काँग्रेसचा हात धरून इथे राष्ट्रवादी पक्ष मोठा झाला. नुसताच मोठा झाला नाही, तर काँग्रेसचा एककलमी कार्यक्रम राबवत काँग्रेसला राष्ट्रवादीने गिळंकृत केले. त्यामुळे मागील दशकात काँग्रेस तालुक्यातून बेदखल झाली.
याला मित्र पक्षांसोबत काँग्रेसचे जिल्हा व राज्यस्तरावरील नेतेही जबाबदार आहेत.
सध्या कवठेमहांकाळ काँग्रेस कात टाकताना दिसत आहे. नुकत्याच कवठेमहांकाळ काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी पार पडल्या. यामध्ये काँग्रेसने नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांवर तालुक्याची जबाबदारी दिली. यामध्ये तालुका अध्यक्ष संजय हजारे, कार्याध्यक्ष अविराजे शिंदे यांच्याकडे पक्षाची धुरा दिली आहे; तर काँग्रेसने तालुका सोशल मीडियाही सक्रिय केला आहे. यामध्ये संग्राम सोनावणे या तरुण चेहऱ्याला जबाबदारी दिली आहे.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुरव, प्रदेश सदस्य माणिकराव भोसले, जिल्हा उपाध्यक्ष धनाजीराव पाटील, वैभव गुरव, राजाराम घोरपडे, रमेश कोळेकर यांनी काँग्रेस पक्ष तालुक्यात पुन्हा जोमाने वाढविण्यासाठी चंग बांधला आहे.
तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील नेते प्रा. दादासाहेब ढेरे यांची राष्ट्रवादीवर असणारी नाराजी हेरत त्यांना पक्षात घेतले. त्यामुळे काँग्रेसला तालुक्यात पुरोगामी चेहरा तर मिळालाच, त्याचबरोबर तालुक्यातील मागासवर्गीय समाजाची व्होटबँक काँग्रेसकडे खेचण्यासाठी प्रा. ढेरे यांचा चेहरा काँग्रेसला बळ देणारा ठरणार आहे.
चाैकट
युवक वर्ग आकर्षित
तालुक्यातील नेतेमंडळी येत्या महिन्याभरात मोठे राजकीय धक्के काँग्रेस देणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस आक्रमक झाल्याने तालुक्यातील युवक वर्गही काँग्रेसकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे.
नूतन अध्यक्ष संजय हजारे हे पैलवान असल्याने त्यांनी काँग्रेसचा राजकीय आखाडाही गाजवण्यास सुरुवात केली आहे. एक आशादायी चित्र काँग्रेसच्या गोटात निर्माण झाले आहे.