कवठेएकंद सरपंचपदी शरद लगारे बिनविरोध
By Admin | Updated: September 9, 2014 23:48 IST2014-09-09T23:15:15+5:302014-09-09T23:48:50+5:30
‘शेकाप’ची सरशी : पहिल्यांदाच मिळाली विरोधकांना संधी

कवठेएकंद सरपंचपदी शरद लगारे बिनविरोध
कवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या शरद बाबूराव लगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत इतिहासात प्रथमच सत्ता असतानाही विरोधी बाकावरील सदस्यांना सरपंचपदाची संधी मिळण्याची किमया घडली.ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ आणि शेतकरी कामगार पक्षाच्या आठ जागा अशी अटीतटीची निवडणूक झाली होती. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर संजयकाका गटातील सरपंच दीपक जाधव यांच्या पदबदलाच्या घडामोडींनंतर राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त होते. त्याजागी राष्ट्रवादीने शेकापला संधी देऊन, सरपंचपदापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली.एक वर्षाची मुदत राहिली असतानाही शेकापने सरपंचपदाची सूत्रे सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. यामध्ये शेकापकडून तीन सदस्यांनी अर्ज भरले होते. शरद लगारे यांना सरपंचपदाची संधी देऊन त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यावेळी मंडल अधिकारी यु. डी. कांबळे, तलाठी राहुल कोळी, ग्रामविकास अधिकारी टी. पी. जाधव, पोलीसपाटील किसनराव जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकरराव माळी यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले. शेकापला संधी देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. सकाळपासूनच ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांची गर्दी होती. निवडीनंतर शेकापच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. भाई शंकरराव माळी, सूर्यकांत पाटील, विठ्ठल कुंभार, विजय पाटील, प्रा. बाबूराव लगारे, विनोद कुलकर्णी, वसंतराव तपासे, नामदेव गुरव उपस्थित होते. (वार्ताहर)
राष्ट्रवादी तटस्थ
राष्ट्रवादीकडे नऊ, तर शेकापकडे आठ जागा होत्या.परंतु लोकसभा निवडणुकीनंतर खासदार गटाच्या दीपक जाधव यांनी राजीनामा दिला होता. या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका घेतली.