पतंगरावांच्या घोषणेने दादा गटात खळबळ

By Admin | Updated: September 9, 2014 23:48 IST2014-09-09T23:08:00+5:302014-09-09T23:48:01+5:30

समीकरणे बदलणार : लोकसभेच्या दावेदारांना लागली चिंता

Kathangarwa's announcement caused the excitement in the grandfather's group | पतंगरावांच्या घोषणेने दादा गटात खळबळ

पतंगरावांच्या घोषणेने दादा गटात खळबळ

सांगली : विधानसभेची शेवटची निवडणूक लढविण्याची घोषणा करून पतंगरावांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिल्याने, जिल्ह्याच्या राजकीय वतुर्ळात तसेच वसंतदादा गटात खळबळ माजली आहे. माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्यासह दादा घराण्यातील अन्य वारसदार व समर्थकांमध्ये दोन दिवसांपासून या गोष्टीची चर्चा सुरू आहे. पतंगरावांचे पुढचे पाऊल काय असेल, यावर आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघात अभेद्य असलेला काँग्रेसचा बालेकिल्ला यंदा ढासळला. वसंतदादांचे नातू असलेले प्रतीक पाटील यांचा मोठ्या मतांनी पराभव झाल्याने, अजूनही या धक्क्यातून दादाप्रेमी सावरलेले नाहीत. त्यातच पतंगरावांच्या लोकसभा निवडणुकीच्या संकेतांमुळे सांगलीतील दादा गटात खळबळ माजली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये कदम गट व दादा गट अस्तित्वात असल्याचे नेहमीच बोलले जाते. पतंगरावांनी नेहमीच हा मुद्दा खोडून काढला आहे. तरीही या चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात सुरू असतात.
सांगली लोकसभेच्या २00९ च्या निवडणुकीतही कदम व दादा गटातील संघर्ष काँग्रेस कार्यकर्त्यांनी तसेच जिल्ह्याने पाहिला होता. लोकसभेसाठी विश्वजित कदम यांनीही उमेदवारी मागितली होती. प्रतीक व विश्वजित यांच्यात उमेदवारीवरून जोरदार संघर्ष पक्षीय पातळीवर आला होता. त्यावेळीही दोन गटांत काँग्रेस विभागली गेली होती. अखेर तिकीट प्रतीक पाटील यांना मिळाल्यानंतर विश्वजित कदम यांनी पक्षीय प्रचारात सहभाग घेतला. मात्र तोपर्यंत अप्रत्यक्षपणे दोन्ही नेते व त्यांच्या समर्थकांकडून परस्परांवर टीका होत होती. महापालिका निवडणुकीपूर्वी दादा व कदम गटात समेट झाला. मदन पाटील यांनीच यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे दोन्ही गटांचे सूर जुळले. आजही कदम व दादा गटातील कार्यकर्ते एकत्रित दिसत आहेत. अशा परिस्थितीत अचानक पतंगरावांच्या घोषणेने शंका-कुशंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
पतंगराव सांगली लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले, तर वसंतदादा घराण्याच्या दावेदारीचे काय होणार?, असा प्रश्न आतापासूनच उपस्थित केला जात आहे. गत लोकसभेचा अपवाद वगळला, तर वसंतदादांच्या घराण्याने लोकसभेला कधीही पराभव पाहिला नव्हता. यंदा या परंपरेला धक्का बसला होता. त्यातच पतंगरावांच्या घोषणेवरून वसंतदादा गटात आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीत दादा घराण्याअंतर्गतच गटबाजीची चर्चा सुरू झाली आहे. यात आता पतंगरावांच्या चर्चेची भर पडली आहे. (प्रतिनिधी)

पुण्यापेक्षा सांगलीच सोयीची..!
पतंगराव कदम यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय भविष्यात जाहीर केलाच, तर त्यांना सांगलीच अधिक सोयीचा मतदारसंघ ठरेल, असे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे मत आहे. विश्वजित कदम यांचा पुणे मतदारसंघात मोठा पराभव झाल्याने त्याठिकाणी पुन्हा धोका पत्करण्याचा निर्णय त्यांच्याकडून होईल, असे कार्यकर्त्यांना वाटत नाही. दोन्ही मतदारसंघांचा विचार सुरू झाला, तर त्यांच्या समर्थकांकडूनही सांगलीसाठीच आग्रह होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीला अजून पाच वर्षांचा कालावधी असला तरी, सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये आणि एकूणच राजकीय क्षेत्रातील समीकरणे पतंगरावांच्या या घोषणेमुळे बदलण्यास सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे.

Web Title: Kathangarwa's announcement caused the excitement in the grandfather's group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.