कासेगाव सोसायटीच्या निवडणुकीत चुरस

By Admin | Updated: March 3, 2015 00:27 IST2015-03-02T23:46:54+5:302015-03-03T00:27:42+5:30

विरोधकही झाले आक्रमक : सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न

Kasegaon society elections | कासेगाव सोसायटीच्या निवडणुकीत चुरस

कासेगाव सोसायटीच्या निवडणुकीत चुरस

प्रताप बडेकर- कासेगाव (ता. वाळवा) येथील पूर्व भाग व पश्चिम भाग सेवा सहकारी सोसायट्यांची निवडणूक तब्बल २५ वर्षांनंतर होणार आहे. या दोन सोसायट्यांवर माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील गटाची सत्ता आहे. विरोधकांनी एकजूट करुन सत्ताधाऱ्यांना आव्हान दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
दोन्ही सोसायट्यांची सत्ता गेल्या २५ वर्षांपासून माजी मंत्री जयंत पाटील गटाकडे आहे. ज्येष्ठ नेते जनार्दनकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थांचा कारभार सुरु आहे. २५ वर्षांपूर्वी पूर्व भाग सोसायटीची सत्ता ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व वसंतदादांचे खंदे समर्थक मारुती यशवंत पाटील यांच्याकडे होते. ते १0 वर्षे या संस्थेचे अध्यक्ष होते. पश्चिम भाग सोसायटीची स्थापना बंडोपंत कुलकर्णी यांनी केली.
कुलकर्णी हे राजारामबापू पाटील यांचे समर्थक असल्याने त्यांच्या समर्थकांचेच वर्चस्व होते. बापूसाहेब शिंदे हे काही काळ अध्यक्षपदावर होते. मात्र त्यावेळी मारुती पाटील, अ‍ॅड. बी. डी. पाटील यांची ताकद त्यांच्या पाठीशी होती. त्यानंतर आजअखेर या दोन्ही संस्थांवर जयंत पाटील गटाची एकतर्फी सत्ता राहिली आहे.
यावेळी मात्र सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांनी सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अर्ज माघारीच्या दिवशी पूर्व भाग सोसायटीमध्ये ५, तर पश्चिम भागमध्ये ७ जागांवर उमेदवार राहिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. ७ मार्च रोजी मतदान होणार आहे.
विरोधी गटाकडून नेताजी पाटील, भीमराव माळी, पांडुरंग वाघमोडे, विजय पाटील, जयदीप पाटील, एस. के. पाटील, सुरेश माने, दादा वाघमोडे, बापूसाहेब शिंदे, विकास
हुबाले, दिनकर जाधव, ज्ञानदेव पाटील हे प्रचाराची धुरा सांभाळत असून, सत्ताधारी गटाकडून ज्येष्ठ नेते जनार्दन पाटील, देवराज
पाटील, उदयसिंह पाटील, किरण पाटील, विलास पाटील, सुरेश गावडे, शिवाजी माळी, संजय सोनटक्के, अण्णा माने नेतृत्व करत आहेत.

देवराज-नेताजी पुन्हा आमने-सामने
सत्ताधारी गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते माघारीपर्यंत बारकाईने लक्ष ठेवले असून, विरोधी गटाचे अर्ज माघारीसाठी त्यांनीच प्रयत्न केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे विरोधी गटाकडून नेताजी पाटील यांनी पुढाकार घेतला असून सर्व विरोधकांना एकत्र केले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकलेले हे दोन युवा नेते गावपातळीवरही एकमेकांविरोधात रान उठवत आहेत.

Web Title: Kasegaon society elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.