Karnataka's water supply to the border areas | सीमा भागातील गावांना पाणी पुरवठ्याचे कर्नाटकचे नियोजन
सीमा भागातील गावांना पाणी पुरवठ्याचे कर्नाटकचे नियोजन

ठळक मुद्देसीमा भागातील गावांना पाणी पुरवठ्याचे कर्नाटकचे नियोजन तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदिल

मिरज : कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबत निर्णय होत नसल्याने कर्नाटक हद्दीत सीमाभागातील गावांत तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदिल आहेत. कोयनेतून पाणी मिळत नसल्याने गोकाकजवळ हिडकल धरणातून सोमवारी अथणी व कागवाड तालुक्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. शिरोळ तालुका सीमेवर कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने महाराष्ट्रातील  कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी आहे.

गतवर्षी कोयना व वारणा धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात आले होते. त्याप्रमाणे यावर्षीही कोयनेतून पाणी सोडण्याची कर्नाटक जलसंपदा विभागाची मागणी आहे. मात्र कर्नाटकला पाणी दिल्यानंतर कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर योजनेतून जत परिसरात देण्याच्या अटीमुळे पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय होत नसल्याने अथणी व कागवाड तालुक्यात नदीकाठावरील कुडची, उगार, जुगूळ, शिरगुप्पी, ऐनापूर, कृष्णाकित्तूर यासह अनेक गावात तीव्र पाणीटंचाई आहे.

कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठल्याने जमखंडी व बागलकोट परिसरात पाणीटंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. अथणी व कागवाड तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक व शेतकरी आंदोलन करीत आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस व भाजप लोकप्रतिनिधींनी पाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन, कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र पाणी सोडण्यात आले नसल्याने गोकाकजवळ असलेल्या मलप्रभा नदीवरील हिडकल धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे.

धरणातून कालव्याद्वारे रायबाग, ऐनापूर येथून कुडचीजवळ कृष्णा नदीत सोमवारपासून दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. अथणी व कागवाड तालुक्यात ७८ गावांत ग्रामस्थ पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे २३ मेनंतर कोयनेतून कर्नाटकसाठी पाणी सोडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.


Web Title: Karnataka's water supply to the border areas
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.