पतंगरावांचा ‘बाबां’ना धोबीपछाड!
By Admin | Updated: October 21, 2014 00:19 IST2014-10-20T23:59:08+5:302014-10-21T00:19:10+5:30
‘होम टू होम’ प्रचारावर भर

पतंगरावांचा ‘बाबां’ना धोबीपछाड!
प्रताप महाडिक- कडेगाव -पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार व ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी विरोधकांचे चक्रव्यूह भेदत, विरोध मोडून काढत पलूस-कडेगावच्या मैदानातील जंगी कुस्ती मारली. त्यांनी भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांच्यावर २४ हजार ३४ मतांनी मात करीत विजयी चौकार मारला.
पलूस-कडेगाव मतदारसंघावर गेली १५ वर्षे डॉ. पतंगराव कदम यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. परंतु यावेळी डॉ. कदम यांची घोडदौड रोखण्यासाठी पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपकडून उमेदवारी करीत जोरदार फिल्डिंग लावली होती. डॉ. पतंगराव कदम विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक प्रचार करीत होते, तर पृथ्वीराज देशमुख, कदमविरोधकांना एकसंध करीत पाणीप्रश्न, विकास कामांतील उणिवा प्रकर्षाने दाखवीत होते. निवडणूक प्रचार काळात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फै री झडत होत्या. डॉ. पतंगराव कदम यांना शह देण्याची सर्वतोपरी तयारी पृथ्वीराज देशमुख यांनी केली होती. कऱ्हाड-विटा रस्त्याच्या उत्तरेकडील भागावर पृथ्वीराज देशमुख यांना मताधिक्य मिळण्याचे संकेत होते. परंतु येथेही डॉ. पतंगराव कदम यांनी अटीतटीची झुंज दिली. काँग्रेसचा बालेकिल्ला, सोनहिरा खोराही कदम यांनी अबाधित राखला आणि पलूस तालुक्यातही चांगले यश कदम यांनी मिळविले.पतंगरावांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच्या कालखंडात विकास कामांची माहिती दर्शविणारे डिजिटल गावोगावी लावले होते. याशिवाय नवीन मंजूर कामांचे भूमिपूजन समारंभही केले होते. यामुळे गावोगावी काँग्रेस कार्यकर्ते रिचार्ज झाले होते. आचारसंहिता लागू होताच पतंगरावांनी गावोगावी भेटी देऊन तेथील काँग्रेसअंतर्गत गटबाजी मोडून काढली. दरम्यान, पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. भाजपचे तिकीट मिळाल्यावर पृथ्वीराज देशमुख यांनी प्रचारयंत्रणा वेगात सुरू केली. यावेळी मतदारसंघात अटीतटीची लढत होईल, असे वातावरण होते. उमेदवारी अर्ज माघारीनंतर पलूस-कडेगावमध्ये प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या. काँग्रेसचे पतंगराव कदम व भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारसभांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता.
मोदी लाटेचा फायदा पृथ्वीराज देशमुख यांना होईल, असे वातावरण होते, तर मतविभागणीचा फायदा पतंगराव कदम यांना होईल, असे चित्र होते. देशमुख यांच्या प्रचारार्थ भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा झाल्या. याला पतंगरावांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, अभिनेता रितेश देशमुख यांना बोलावून प्रतिउत्तर दिले. मालनताई मोहिते, भीमराव मोहिते, दीपक भोसले, इंद्रजित साळुंखे, सत्यजित यादव-देशमुख, बाळकृष्ण यादव, सुरेश मोहिते, जे. के. जाधव, महेंद्र लाड, ए. डी. पाटील, श्रीकांत लाड, हेमंत पाटील आदी कित्येक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांत पतंगरावांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. नियोजनबद्ध व घरोघरी पोहोचून गावोगावच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला. विरोधकांनी गावोगावी जोरदार फिल्डिंग लावली होती. परंतु डॉ. कदम यांनी नाराजांना भेटून विरोध मोडून काढण्यात चांगलेच यश मिळविले आणि चौथा विजय संपादन केला.
‘होम टू होम’ प्रचारावर भर
पतंगराव कदम यांनी सावध पावले उचलत काँग्रेस कार्यकर्ते एकसंध केले. ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, शांताराम कदम, युवा नेते जितेश कदम, सौ. वैशालीताई कदम यांच्यासह कदम कुटुंबियांनी होम टू होम प्रचारावर भर दिला.भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, युवा नेते संग्रामसिंह देशमुख, क्रांतीचे अध्यक्ष अरुण लाड, लालासाहेब यादव, भारत पाटील आदींनी देशमुख यांच्या प्रचारसभा गाजविल्या व गावोगावी प्रचारयंत्रणाही राबविली.