काणेबुवांनी गायकीची निखळ परंपरा चालवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:25 IST2021-02-07T04:25:03+5:302021-02-07T04:25:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संगीताचार्य द. वि. काणेबुवांनी कधीही हातचे राखून शिष्यांना शिकवले नाही. त्यांनी या क्षेत्राला गायकीची ...

काणेबुवांनी गायकीची निखळ परंपरा चालवली
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संगीताचार्य द. वि. काणेबुवांनी कधीही हातचे राखून शिष्यांना शिकवले नाही. त्यांनी या क्षेत्राला गायकीची निखळ परंपरा दिली, असे गौरवोद्गार अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. विकास कशाळकर यांनी काढले.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय आणि संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात ‘संगीत कलाविहार’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. कशाळकर, प. पू. झेंडे महाराज, गांधर्व महाविद्यालयाचे उपाध्यक्ष पं. पांडुरंग मुखडे, पं. हृषिकेश बोडस, मंगला जोशी, बाळासाहेब सूर्यवंशी गंगाखेडकर, सुधाकर चव्हाण, गोविंद बेडेकर, गुरुकुलच्या मंजूषा पाटील, बाळकृष्ण विभुते यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कशाळकर म्हणाले की, सांगली, मिरजेचा हा परिसर म्हणजे शास्त्रीय संगीताची गंगोत्री आहे. संगीतरत्न अब्दुल करीम खाँ, पं. विष्णू दिगंबर पलूसकर, पं. द. वि. काणेबुवा यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या घराण्यांच्या परंपरेचा बहर येथे फुलला. काणेबुवांनी गायकी सुंदर व्हावी म्हणून अट्टाहास धरला. संगीतात प्रेमभाव हवा. केवळ तानांनी गाणे सुंदर होत नसते. गाण्याचे सौंदर्य भावात लपले आहे. त्यामुळे काणेबुवांनी एक सुंदर परंपरा या क्षेत्राला दिली.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुकुलची विद्यार्थिनी नूपुर देसाई हिच्या गायनाने झाली. तिने राग पुरिया धनश्री तिलवाडा तालातील अदारंभ नित द्रूत तीनतालमधील ‘पायलिया झनकार’ सादर केले. तबल्यावर नीलेश काळे, हार्मोनियमवर केदार सांभारे यांनी साथ दिली.
कार्यक्रमाची सांगता हृषिकेश बोडस यांच्या गायनसेवेने झाली. त्यांनी सुरुवातीला राग भूपमधील ‘अब मान ले’, द्रूत तीनतालमध्ये ‘सखी री आज आनंद’, राग सोहनीमधील ‘मोहे लागी लटक गुरुचरण की’ ही बंदिशी, तर ‘कोण तुजसम सांग गुरुराया मज’ हे नाट्यगीत सादर केले. मैफलीची सांगता ‘तुझिये निढळी कोटी चंद्र-प्रकाशे’ या भैरवीने केली.
स्वागत व प्रास्ताविक सौ. मंजूषा पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय कोटणीस यांनी केले.