कडेगावचा मोहरम साधेपणाने होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:30 IST2021-08-19T04:30:16+5:302021-08-19T04:30:16+5:30
कडेगावला मोहरमनिमित्त येथे चौदा ताबूत बसविले जातात. त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात. कडेगाव येथे हिंदू-मुस्लीम बांधव सर्व ...

कडेगावचा मोहरम साधेपणाने होणार
कडेगावला मोहरमनिमित्त येथे चौदा ताबूत बसविले जातात. त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात. कडेगाव येथे हिंदू-मुस्लीम बांधव सर्व सणांत एकमेकांना मानपान देऊन ऐक्याचा संदेश देतात. कडेगावचे ताबूत गगनचुंबी म्हणून विख्यात आहेत. कळकाच्या (बांबूच्या) सहायाने अष्टकोनी आकाराचा सांगाडा तयार करून नंतर त्यावर रंगीबेरंगी कागद लावून सजावट केली जाते. ताबूत बांधण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला कोठेही गाठ दिली जात नाही. ‘आधी कळस मग पाया’ अशी त्याची उभारणी असते.
मागील वर्षीप्रमाणे तालुक्यात यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. संसर्ग आणखी वाढू नये यासाठी प्रशासनाने सर्वच धार्मिक सण, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे मोहरम साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ताबुतांची उंची कमी करण्यात आली आहे.
दरम्यान, कोणत्याही प्रकारे गर्दी करू नये, ताबूत, पंजे मिरवणूक काढू नये व शासनाचा आदेश भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. शैलजा पाटील व पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांनी केले आहे.
चौकट
ऐक्याची परंपरा कायम
कडेगाव शहरात मोहरम साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय हिंदू-मुस्लीम बांधवांनी समन्वयाने घेतला. येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा कायम आहे.