कडेगावात पुन्हा काँग्रेसच, की भाजप सत्तांतर घडविणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:16+5:302021-09-02T04:55:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : आगामी नगरपंचायत निवडणुकीत कडेगावचे मैदान कोण मारणार, काँग्रेसच सत्ता कायम ठेवणार, की भाजप सत्तांतर ...

कडेगावात पुन्हा काँग्रेसच, की भाजप सत्तांतर घडविणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : आगामी नगरपंचायत निवडणुकीत कडेगावचे मैदान कोण मारणार, काँग्रेसच सत्ता कायम ठेवणार, की भाजप सत्तांतर घडविणार, याबाबत राजकीय चर्चा सुरू आहेत. त्यातच राष्ट्रवादीही निवडणूक मैदानात उतरणार आहे. यामुळे दोन्ही पक्षांपुढे राष्ट्रवादीचे आव्हान असेल. शिवसेना व अन्य पक्षांची मदत कोणाला मिळणार, हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
कडेगाव नगरपंचायतीवर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे वर्चस्व आहे. आगामी निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दुसऱ्या बाजूला सत्तांतर घडविण्यासाठी माजी आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे प्रयत्न असणार आहेत. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर नोव्हेंबर २०१६ ला पहिली निवडणूक झाली. त्यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम शहरात ठाण मांडून होते. काँग्रेसने १० जागा जिंकल्या, तर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील भाजपला ७ जागा मिळाल्या. सुरुवातीला अडीच वर्षे आकांक्षा जाधव यांना, तर त्यानंतर सव्वा वर्ष नीता देसाई आणि संगीता राऊत यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली.
चार महिन्यांत नगरपंचायतीची निवडणूक हाेत आहे. राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी काँग्रेस लढणार आहे. यामुळे या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. भाजपची भिस्त जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यावर, तर काँग्रेसचे सुकाणू सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्याकडे राहणार आहे.
नगरपंचायतीची सदस्य संख्या १७ आहे. प्रभाग पद्धतीमुळे लढती चुरशीच्या आणि अटीतटीच्या ठरणार आहेत. काँग्रेसची सत्ता असली, तरी कडेगावकरांना बुचकळ्यात पाडणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या आहेत. माजी नगराध्यक्षा नीता देसाई, सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.
शहरातील नागरिकांचे प्रश्न, समस्या आणि विकास कामांसाठी विश्वजित कदम यांनी मागील पाच वर्षांत जवळपास १५ कोटींचा निधी दिला. शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या नवीन योजनेसाठी लवकरच निधी मंजूर होईल. कडेगाव शहर विकासाचे रोल मॉडेल साकारेल ,असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. मात्र काँग्रेसने शहरातील विकासकामात विशेष काही केले नाही, मोठी कामे झाली नाहीत, असा आरोप भाजपकडून होत आहे. काँग्रेस आणि भाजपमधील सत्तासंघर्षात आता राष्ट्रवादीचा पर्याय पुढे येत आहे. उमेदवार कोण, यावरच ज्या-त्या प्रभागातील समीकरणे ठरणार आहेत.
चौकट :
१० हजार ७७३ मतदार
जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार कडेगाव शहरात ५३८९ पुरुष मतदार आहेत, तर ५३८४ महिला मतदार आहेत. शहरात एकंदरीत १० हजार ७७३ मतदान आहे.
चौकट
महसुली उत्पन्न चार कोटी
कडेगाव नगरपंचायतीचे घरपट्टी, पाणीपट्टी, बाजार कर असे असे आर्थिक मिळकतीचे स्रोत आहेत. जवळपास चार कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न आहे.
चौकट:
काँक्रिटीकरण आणि विद्युत रोषणाई
छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले. नवीन वसाहतीमधील रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण झाले. प्रमुख चौक व इतर रस्ते २७ हायमास्ट दिव्यांनी उजळून निघाले आहे. घंटागाडीद्वारे घरोघरी कचरा संकलन हाेते. प्रमुख मार्गावर वृक्षारोपण केले आहे. मात्र सर्व प्रभागात समतोल विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.