कडेगाव गारमेंट पार्क नावालाच, ना शेतजमीन राहिली, ना उद्योग टिकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:04+5:302021-06-11T04:18:04+5:30
फोटो १० दीपक कोरबू फोटो १० वैभव भोसले फोटो १० गणेश जतकर लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ग्रामीण भागात ...

कडेगाव गारमेंट पार्क नावालाच, ना शेतजमीन राहिली, ना उद्योग टिकले
फोटो १० दीपक कोरबू
फोटो १० वैभव भोसले
फोटो १० गणेश जतकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ग्रामीण भागात उद्योग वाढून तरुणांना रोजगार मिळावा, या सद्हेतूने कडेगाव येथे गारमेंट पार्क सुरु झाले. पण सद्यस्थितीत येथील उद्योगांना घरघर लागली असून, शासनाचा हेतू असफल झाला आहे. तरुणांना रोजगार देण्याचे स्वप्नही प्रत्यक्षात येऊ शकले नाही.
या वसाहतीत सुशिक्षित बेरोजगार तरुण व युवा उद्योजकांनी मोठ्या संख्येने टेक्स्टाईल उद्योग सुरु केले. पण व्यावसायिक अडचणी, बाजारपेठेचा अभाव, स्पर्धेमुळे उत्पन्नावर झालेला परिणाम अशा अनेक कारणांनी वसाहतीला घरघर लागली आहे. बहुतांश उद्योजक कर्जबाजारी झाले असून, बॅंकेने कारखान्यांच्या लिलावाच्या नोटीस जारी केल्या आहेत. टेक्स्टाईल उद्योग वापरत असलेल्या जागा, इमारती व यंत्रसामग्रींचा लिलाव जाहीर केला आहे. सर्रास कंपन्यांनी बॅंकांकडून कर्जे घेऊन व शासनाच्या अनुदानाच्या भरवशावर उद्योग सुरु केले. पण उलाढाल गतीने होऊ शकली नाही. कर्जांचे हप्ते थकत गेले. कापड उद्योगाला जागतिक स्तरावरच अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने या उद्योजकांसमोरही संकटांची मालिका सुरु झाली. बहुतांश उद्योगांनी या संकटात गटांगळ्या खाल्ल्या. सुरुवातीला काही वर्षे उत्पादन घेतल्यानंतर त्यांनी स्वत:हून उद्योगाला टाळे लावणे पसंत केले. एकप्रकारे दिवाळखोरीच जाहीर केली. शेजारच्या वसाहतीत इंजिनिअरिंग कारखाने मात्र सुरळीत सुरु आहेत.
पॉईंटर्स
जमीन अधिग्रहित ९६.७१ हेक्टर
वर्ष २००२
किती उद्योजकांना वाटप १४०
घोडे कुठे अडले?
- जागतिक बाजारात कापड उद्योगापुढे संकटे उभी राहिली. टेक्स्टाईल उद्योगाच्या सवलती थांबल्या.
- सवलतीच्या वीजदराचा न सुटलेला प्रश्न, ३५ टक्के अनुदानाचे अडलेले घोडे यामुळेही टेक्सटाईल उद्योग ढेपाळले.
- सूत दरातील सातत्याची घसरण, वाढती मजुरी, शासनाचे प्रतिकुल वस्त्रोद्योग धोरण यामुळेही येथील कारखान्यांना टाळे लागले.
- सूत दराबरोबरच कापडाचे दरही घसरले, शासनाने अनुदान वेेळेत दिले नाही, त्यामुळेही उद्योजक डबघाईला आले.
बॉक्स
१४०पैकी २५ उद्योगच सुरु
- गारमेंट पार्कमधील १४०पैकी फक्त २० ते २५ टेक्स्टाईल कारखानेच कसेबसे सुरु आहेत. त्यांचीही आर्थिक घसरण सुरु झाली आहे.
- कारखान्यांसाठी बॅंक ऑफ इंडियाने कर्जे दिली होती. ही कर्जे थकीत राहिल्याने अनेक कारखान्यांचे लिलाव बॅंकेने जाहीर केले आहेत.
- उद्योजक कर्जबाजारी झाले आहेत. लिलावामध्ये कारखान्याची मालमत्ता, जमीन, यंत्रे विकून पैसे उभे करण्याचा बॅंकेचा प्रयत्न आहे.
कोट
औद्योगिक मंदीमुळे रोजगार हिरावला गेला आहे. गेल्या सव्वा वर्षात तर संपूर्ण अर्थचक्र थंडावले आहे. लॉकडाऊनमुळे कारखान्यातील नोकऱ्या संपल्या आहेत. कोरोनामुळे कंपन्यांनी नोकरकपात केल्याचा फटका तरुणांना बसला आहे. शासनाने तरुणांना मदत केली पाहिजे.
- गणेश जतकर
उद्योगांना घरघऱ लागल्याने तरुणांना शेतात कामाशिवाय पर्याय राहिलेला नाही. जिरायत शेतात उत्पन्नाची हमी नसल्याने तरुणांना शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे, पण लॉकडाऊनमुळे शहरातही रोजगार उपलब्ध नाही.
- वैभव भोसले
एमआयडीसीतील नोकऱ्या कायमस्वरुपी फायद्याच्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरुणांना आता शेतात वेगळे प्रयोग करुनच उत्पन्न घ्यावे लागेल. शासन उद्योगांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने रोजगारनिर्मिती थांबली आहे.
- दीपक कोरबू